संरक्षण भिंत नसल्याने घरे कोसळण्याची भीती
By admin | Published: July 27, 2016 12:11 AM2016-07-27T00:11:37+5:302016-07-27T00:11:37+5:30
गढीवर असलेल्या घरांना संरक्षण भिंत नसल्याने ती कोसळ्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत संरक्षण भिंत बांधावी,..
पवनारच्या गढीवरील घरे धोक्यात : नागरिकांनी आमदारांचे लक्ष वेधले
पवनार : गढीवर असलेल्या घरांना संरक्षण भिंत नसल्याने ती कोसळ्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी नागरिकांनी केली. याबाबत आ.डॉ. पंकज भोयर यांना निवेदन देण्यात आले.
पवनार येथे इंदिरानगर येथू घरकूल योजनेचे व वैयक्तिक बांधलेली १०-१५ घरे आहेत. सदर घरे गढीवर असून त्या खाली पुरुषोत्तम हिवरे यांचे घर व रिकामा भूखंड आहे. हिवरे यांनी आपला भूखंड मोकळा करण्यासाठी जेसीबीच्या साह्याने खोदकाम करून आपला भूखंड मोकळा केला; पण त्यामुळे गढी कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे गढी सभोवताल संरक्षण भिंत बांधून द्यावी, अशी माणगी नागरिकांनी केली आहे.
पावसामुळे गढीला ठिकठिकाणी तडे गेले असून त्यात पाणी मुरल्यास गढी कधीही कोसळून घरांचे नुकसान व जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घरांना संरक्षण भिंतीचे बांधकाम करून द्यावी, अशी मागणी सरपंच अजय गांडोळे व सदर कुटुंबीयांनी केली. यावर आ.डॉ. भोयर यांनी ही अडचण लवकरच दूर केली जाईल, अशी ग्वाही दिली. निवेदन देताना नामदेव वाढवे, सुरेश काशीकर, रमेश कांबळे, कुंदण कळणे, मारोती कांबळे, लक्ष्मण खंगार, रंजीत धोंगडे, नरेश कोराम, राहुल, गणेश मसराम आदी उपस्थित होते.(वार्ताहर)
निधी देण्याची मागणी
पवनार येथे गढीवर असलेल्या घरांना पावसाळ्यात धोका असतो. पावसामुळे गढी ढासळून अपघाताची शक्यता बळावली आहे. यामुळे संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून आ.डॉ. भोयर यांना करण्यात आली आहे. संरक्षण भिंतीचे बांधकाम झाल्यास घरांना सुरक्षा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.