शाळा बंद तरी पालकांच्या मोबाईलवर ‘फी’चे संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 07:58 PM2020-06-22T19:58:46+5:302020-06-22T19:59:09+5:30
शाळांच्या या भूमिकेमुळे पालकांच्या अडचणीत वाढ झाली असून फी च्या रकमेसाठी तगादा का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना महामारीच्या काळात गेल्या तीन महिन्यांपासून सर्व प्रकारचे दळणवळण थांबले आहे. त्यामुळे पालकांजवळ पुरेसा पैसा नाही. कुटुंबाचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांना आधीच मोठी कसरत करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शैक्षणिक सत्र सुरू करण्यासाठी राज्यभरातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे शासनाने ठरवले असले तरी कोरोनाबाधितांमुळे व्यापलेले स्थानिक क्षेत्र पाहता ते वेळापत्रक याठिकाणी पाळले जाईल, याची खात्री जिल्हा प्रशासनालाही देता येत नाही. असे असले तरी शाळांनी मात्र आपले धूमशान सुरू केले असून, फी वसुलीसाठी पालकांना मोबाईलवर संदेश पाठवण्याचे सत्र सुरू केले आहे. शाळांच्या या भूमिकेमुळे पालकांच्या अडचणीत वाढ झाली असून फी च्या रकमेसाठी तगादा का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना महामारीच्या काळात गेल्या तीन महिन्यांपासून सर्व प्रकारचे दळणवळण थांबले आहे. त्यामुळे पालकांजवळ पुरेसा पैसा नाही. कुटुंबाचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांना आधीच मोठी कसरत करावी लागत आहे.
त्यातच शाळांनी फी बाबतचे संदेश पाठवणे सुरू केल्यामुळे ते अस्वस्थ झाले आहे.काही शाळांनी दिलेल्या संदेशानुसार पालकांनी तातडीने शाळांशी संपर्क करून फी भरावी व आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा, असे म्हटले आहे. नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर एका पालकाने सांगितले, की शाळांनी सुरू केलेला हा तगादा पालकांना अजिबात आवडलेला नाही.
कोरोनाचे संकट जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत शाळा तरी कशी सुरू होणार, असा प्रश्न पालक करीत आहे. शिवाय यावर्षीचे एकूणच सत्र हे कमी कालावधीचे राहणार असल्याने शाळांनी पूर्ण फी का मागावी, असाही सूर पालकांकडून उमटत आहे.
या आहेत पालकांच्या मागण्या
शुल्क वसुलीबाबत शाळांनी तगादा लावू नये.
शुल्क भरण्यासाठी टप्पे (किस्त) पाडून द्यावे.
जेवढ्या कालावधीसाठी प्रत्यक्ष ज्ञानदान होणार आहे, त्याच कालावधीची फी आकारली जावी.
कोणत्याही प्रकारची अतिरिक्त फी मागितली जाऊ नये.