मधमाशांच्या पोळाने पं.स. कार्यालयात भीतीचे वातावरण
By admin | Published: February 3, 2017 01:51 AM2017-02-03T01:51:12+5:302017-02-03T01:51:12+5:30
येथील पंचायत समिती परिसरातील कडुलिंबाच्या झाडावर असलेले आग्या मधमाशाचे पोळ नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे.
बंदोबस्त करा : ६० ते ७० नागरिक जखमी
समुद्रपूर : येथील पंचायत समिती परिसरातील कडुलिंबाच्या झाडावर असलेले आग्या मधमाशाचे पोळ नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे. या मधमाशीच्या पोळ्यातील माशांच्या हल्ल्यात आतापर्यंत ६० ते ७० नागरिक जखमी झाले आहेत. यामुळे या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांत दहशत पसरली आहे.
जाम-गिरड राज्यमार्गावरील पंचायत समिती कार्यालयासमोर एक मोठे लिंबाचे झाड आहे. या झाडावर पाच ते सहा महिन्यांपासून मधमाशीचे पोळे आहे. कडुलिंबाच्या झाडालगतच उपहारगृह असल्यामुळे तेथील भट्टीतून निघणाऱ्या ज्वालामुळे मधमाशा उडतात. त्या माशा रस्त्यावरील वाहनचालक, वाटसरूंवर हल्ला चढवितात. या हल्ल्यात आतापर्यंत ६० ते ७० नागरिक जखमी झाले. यामध्ये चिमुकल्यांसह ज्येष्ठही जखमी झाले.
निसर्गाच्या नियमानुसार आता पानगळती सुरू झाल्यामुळे मधमाशाचे पोळ उघडे पडले आहे. त्यामुळे त्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. दररोज अचानक होणाऱ्या हल्ल्यामुळे नागरिक दहशतीत आहेत. एखादा हल्ला कुणाच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या पोळाचा बंदाबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. वनविभागाने मधमाशीचा बंदोबस्त करण्याची मागणी सूरज पेंदाम, रोशन वावधने अनिल कडवे, शुभम वाढई, प्रीतम लोहकरे, मंगेश चिताडे, निखिल पेंदामकर, वैभव मेन्ढुले, विजेंद्र वासे, सूबोध रंगारी, पंकज रोकडे आदींनी केले.(तालुका प्रतिनिधी)