एकांकिका महोत्सवाला नाट्यरसिकांची भरभरून दाद
By admin | Published: March 20, 2017 12:42 AM2017-03-20T00:42:06+5:302017-03-20T00:42:06+5:30
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत
‘श्यामची आई’ ने स्पर्धेला प्रारंभ : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा उपक्रम
वर्धा : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित महाएकांकिका महोत्सवाला नाट्यरसिकांनी भरभरून दाद देत आपल्या पसंतीची पावती दिली. या नाट्यमहोत्सवाला वर्धेकरांनी चांगलीच गर्दी केली आहे.
या महोत्सवात राज्यातील पुरस्कारप्राप्त सहा एकांकिकांचा सहभाग आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सावंगीच्या आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती, माजी खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व अभिनेते योगेश सोमण, श्रीनिवास नार्वेकर, हरीश इथापे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधीक्षक अंकुश भगत, महोत्सवाचे समन्वयक संजय इंगळे तिगावकर, विनायक सैद, अजिंक्य भोसले, अभ्युदय मेघे यांची उपस्थिती होती.
महोत्सवाची सुरुवात सिडनहॅम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘श्यामची आई’ या एकांकिकेने झाली. स्वप्नील जाधव लिखित व स्वप्नील बोरस्कर दिग्दर्शित या एकांकिकेतून मुंबईसारख्या महानगरीय जीवनातील मुलगा आणि म्हातारी विधवा आई यांच्या नात्यातील घुसमट अत्यंत प्रभावीपणे सादर झाली. नव्या काळातील ‘श्यामची आई’ हास्याची पेरणी करतानाच उपस्थितांना अस्वस्थही करून गेली. त्यापाठोपाठ सादर झालेली अहमदनगर येथील निर्मिती रंगमंच प्रस्तुत ‘खटारा’ ही एकांकिका शेतकऱ्यांची व्यथा मांडत परिस्थितीशी लढण्याचा आणि परिवर्तनाचा संदेश देऊन गेली. लेखक व दिग्दर्शक अमोल साळवे यांनी ग्रामीण वारसा जोपासण्याचे आवाहनच या नाट्यकृतीतून केले आहे.
रंगमंचावरील नेपथ्य आणि प्रकाशयोजनाही दाद मिळवून गेली. तर अमरावतीच्या स्पंदन परिवार प्रस्तुत व गणेश वानखेडे लिखित, दिग्दर्शित ‘चौदा एप्रिलची रात्र’ या एकांकिकेतून प्रतिमा पूजनाऐवजी वैचारिक अनुकरणाचा जागर करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने उत्सव साजरे करीत असताना त्यांच्या मूळ विचारापासून दूर जाऊ नका, असा संदेशच या एकांकिकेतून देण्यात आला. या तीनही एकांकिका प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेल्या. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी वर्धेकर रसिकांनी उपस्थित राहून उर्त्स्फूत दाद देत नाट्यप्रेमाचा परिचय दिला.(प्रतिनिधी)