पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला वाचविण्याऱ्या तरुणांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:18 PM2018-07-11T23:18:16+5:302018-07-11T23:19:04+5:30
शहरात पाच व सहा जुलै रोजी मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे सकाळी अल्प पाणी असणाऱ्या वणा नदीला दुपारी अचानक पूर आला होता. या पुरात आजूबाजूचा परिसर जलमय झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शहरात पाच व सहा जुलै रोजी मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे सकाळी अल्प पाणी असणाऱ्या वणा नदीला दुपारी अचानक पूर आला होता. या पुरात आजूबाजूचा परिसर जलमय झाला. पुरात जुनोना शिवारात वणा नदीच्या तीरावर गुरे सोडण्यासाठी गेलेले शेतकरी टिकाराम मुळे अडकून पडले होते. स्वत:च्या जिवाचा बचाव करण्यासाठी त्यांनी झाडाचा आधार घेतला. रात्रीच्या सुमारास नगरसेवक धनंजय बकाणे, अशोक मोरे, देवा जोशी, सुरज काटकर यांनी माणुसकीचा परिचय देत, जिवाची बाजी लावत शेतकऱ्याला वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. दीड किलोमीटर चिखल व काटे तुडवीत आणि शर्थीचे प्रयत्न करून टिकाराम मुळे आणि त्यांच्या बैलाचे प्राण वाचवले.
या बहादूर तरुणांच्या शौर्याचा सत्कार लोकसाहित्य परिषद, पर्यावरण संवर्धन संस्था व विद्यार्थी सहायता समितीच्या वतीने येथील स्पंदन वसतिगृहाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य अमृतराव लोणारे, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रवींद्र ठाकरे, प्रा. ज्ञानेश्वर खडसे, समाजसेवक प्रवीण उपासे, परिषदेचे सचिव ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. अभिजित डाखोरे, रमेश झाडे, आशीष भोयर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते या चारही तरुणांचा शाल, श्रीफळ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. संचालन व प्रास्ताविक अभिजित डाखोरे तर आभार ज्ञानेश्वर चौधरी यांनी मानले.