सत्यनारायण पूजेला विरोध केल्याबद्दल सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:27 AM2018-11-15T00:27:56+5:302018-11-15T00:29:02+5:30
सत्यनारायणाच्या पुजेवर टीका करून संत गाडगेबाबांचा वैचारिक वारसा चालवित असल्याबाबत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती स्थानिक शाखेच्यावतीने प्रहारचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांचा सत्कार माहेश्वरी भवनात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सत्यनारायणाच्या पुजेवर टीका करून संत गाडगेबाबांचा वैचारिक वारसा चालवित असल्याबाबत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती स्थानिक शाखेच्यावतीने प्रहारचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांचा सत्कार माहेश्वरी भवनात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला.
याप्रसंगी अनिसंच्यावतीने आ. कडू यांना देण्यात आलेल्या निवेदनात डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत सभागृहात आवाज उठवावा, वाघ, अस्वल आदी जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावल्यास शासनातर्फे १० लाख रूपये देण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे वन्यजीव कायद्याप्रमाणे संरक्षित सूचीमध्ये ‘साप’ सुध्दा समाविष्ट आहे. विषारी संर्पदंशाने मृत्यू झाल्यास किंवा उपचारासाठी आलेला खर्च याबाबत सुध्दा बाधित व्यक्तीस किंवा कुटूंबीयास नुकसान भरपाई मिळण्याबाबत सभागृहात आवाज उठविण्याची विनंती करण्यात आली. आमदार बच्चू कडू यांना निवेदन देताना प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे, अंनिसचे राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे, कार्यवाह सुनिल ढाले, सदस्य मुकुंद नाखले व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी आ. कडू यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.