गावातील विकासाच्या मुद्यावर आर्वीतील महिला आक्रमक
By admin | Published: September 11, 2016 12:42 AM2016-09-11T00:42:07+5:302016-09-11T00:42:07+5:30
ग्रामपंचायतीच्या ढासळलेला कारभाराविरूद्ध ग्रामस्थांसह महिलांनी आक्रमक भूमिका घेतली.
गावात समस्यांचा डोंगर : सभेत अधिकाऱ्यांना धरले धारेवर
गिरड : ग्रामपंचायतीच्या ढासळलेला कारभाराविरूद्ध ग्रामस्थांसह महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. गावाच्या विकासाच्या मुद्यावर सभेत उपस्थित अधिकाऱ्यांना महिलांनी चांगलेच धारेवर धरले. यामुळे सभेत तणावही निर्माण झाला होता. अखेर समस्या नोंदवून अधिकाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला.
फरीदपूर गट ग्रा.पं. मधील आर्वी गावात ‘आमचा गाव आमचा विकास’ उपक्रमाची कृती आराखडा बैठक घेण्यात आली. ही बैठक वादग्रस्त ठरली. महिलांनी अधिकारी व ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना गावाच्या विकासावर चर्चा करण्याऐवजी प्रत्यक्ष समस्या दाखविल्या. दरम्यान, काही युवकांचा शाब्दिक तोल गेल्याने वातावरण तापले होते. परिणामी, अधिकाऱ्यांनी नमते घेत नागरिकांनी सुचविलेली कामे विकास आराखड्यात नमूद करीत काढता पाय घेतला. आर्वी गावात आदिवासी बांधावांची वस्ती असली तरी विकासाबाबत गावाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. गावात प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने येथील आदिवासी बांधवांना समस्यांना तोंड द्यावे लागते. ग्रा.पं. कडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा रोष महिलांनी सभेत व्यक्त केला.
गावात पाणी पुरवठा योजना असून ग्रामस्थांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सदोष असल्याने नळाला दूषित पाणी येते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. गावातील एक रस्ता वगळता पूर्ण रस्ते मजबुतीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. एका वॉर्डातील नालीचे बांधकाम झाले; पण उर्वरित संपूर्ण गावातील सांडपाणी रस्त्यावरून वाहते. यामुळे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. यामुळे गावात साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. पिण्याच्या पाण्याची विहीर असून त्यात नालीतील गढूळ पाणी पाझरते. यामुळे विहिरीतील पाणी दूषित होत आहे. याकडे ग्रा.पं. दुर्लक्ष करीत असल्याने असंतोष पसरला आहे. मुख्य रस्त्यांनी विद्युत खांब आहे; पण पथदिवे लावले नाही. यामुळे रस्त्याने ये-जा करणे जिकरीचे आहे.
फरीदपूर व आर्वी गावाच्या विकासासाठी कृती आराखडा सरपंच संजय राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रशिक्षक अल्का वानखेडे, आरोग्य विस्तार अधिकारी वानखेडे, कृषी सहायक शेख, आरोग्य सेवक पी.टी. अंबादे, ग्रामसेवक तेलरांधे, ग्रा.पं. सदस्य अनिल गुडधे उपस्थित होते. आमचा गाव आमचा विकास कृती आराखड्यात नळयोजनेच्या विहिरीचे खोलीकरण, गावातील रस्त्यांची निर्मिती, नाल्याचे बांधकाम आदी कामांना मान्यता देण्यात आली. सभेला उपस्थितांचे आभार ग्रामसेवक तेलरांधे यांनी मानले.(वार्ताहर)