पोलीस ठाण्यावर महिलांची धडक
By admin | Published: July 14, 2016 02:15 AM2016-07-14T02:15:01+5:302016-07-14T02:15:01+5:30
दारूबंदीसाठी कार्य करीत असलेल्या दारूबंदी माहिला मंडळाच्या महिलांवर अनेकदा प्राणघातक हल्ले होत असतात.
जनवादी महिला संघटना : दारूबंदी करणाऱ्या महिलांना सरंक्षण द्या
खरांगणा (मो.) : दारूबंदीसाठी कार्य करीत असलेल्या दारूबंदी माहिला मंडळाच्या महिलांवर अनेकदा प्राणघातक हल्ले होत असतात. त्यामुळे दारूबंदीसाठी कार्य करीत असलेल्या महिलांना पोलीस संरक्षण अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महिलांनी केली. एवढेच नव्हे तर सदर मागणीसाठी खरांगणा पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढण्यात आला.
या मोर्चात जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष प्रभा घंगारे, प्रतिभा हाडके, दुर्गा काकडे, निर्मला वाघ, लंका धुर्वे, दीपमाला मालेकर, आदीसह संघटनेच्या इतरही महिला सहभागी झाल्या होत्या. खरांगणा येथील काळे महाराज देवस्थानापासून मोर्चाला सुरूवात झाली. सदर मोर्चा आठवडी बाजार, बसस्थानक मार्गे पोलीस ठाण्यात पोहचला. दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा या मागणीच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. पोलीस स्टेशन समोर द्वारसभाही घेण्यात आली. यात सीताराम लोहकरे, गणपत मेंढे, संजय भगत, चंद्रभान नाखले, दुर्गा काकडे यांनी भाषणे दिली.
दारूविक्रेत्यांना सहा महिने जमानत देवू नये, दारूबंदीचे कार्य करणाऱ्या महिलांना शासकीय कायदे कमी पडत असल्याने आरोपी मोकाट फिरून नाहक त्रास देतात. गावात शांतता व सुव्यवस्था राहावी, अवैध धंदे बंद करावे, पोलीस पाटील, बीट जमादार, यांच्याकडून दारूविक्रेत्यांची यादी मागून कडक कारवाई करावी, माहिलआंना महिलांना संरक्षण द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. (वार्ताहर)
कठोर कारवाई करण्याची गरज
दारूविक्रेत्यांना अटक केल्यावर ते लगेचच जामीन घेऊन पुन्हा दारू विकण्यासाठी मोकळे होतात. या काळात अनेक दारूविक्रेते दारूबंदी महिला मंडळाच्या महिलांना धमकावतात. अनेक महिलांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले आहे. त्यामुळे अशा दारूविक्रेत्यांची लावकर जमानत न होऊ देता त्यांना कठोर शासन करणे गरजेचे आहे. तशी मागणी यावेळी करण्यात आली.