भरधाव रेल्वेतून दोघांनी घेतल्या उड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 11:29 PM2017-09-09T23:29:36+5:302017-09-09T23:29:48+5:30
अकोला येथून वर्धेला येताना दोन प्रवाशी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये बसले. या रेल्वेला वर्धेत थांबा नसल्याने त्यांनी वर्धा स्थानक येताच गाडीची गती कमी होताच थेट रेल्वे फलाटावर उड्या मारल्या. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अकोला येथून वर्धेला येताना दोन प्रवाशी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये बसले. या रेल्वेला वर्धेत थांबा नसल्याने त्यांनी वर्धा स्थानक येताच गाडीची गती कमी होताच थेट रेल्वे फलाटावर उड्या मारल्या. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजता घडली.
पुनम कापदे (२१) रा. तापडीया नगर व विलास दत्तात्रय गिरी (४२) रा. कोल्हारी, गौरक्षण रोड जि. अकोला अशी जखमीची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील पुरूषाच्या खांद्याला तर युवतीच्या डोक्याला व हाताला जबर इजा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सुत्रानुसार, पुनम कापदे आणि विलास गिरी हे अकोला येथून ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये चढले. त्यांना वर्धेला यायचे होते. प्रवासादरम्यान या गाडीचा वर्धेत थांबा नसल्याचे समोर आले. सदर गाडी बडनेरा स्थानकावरून रवाना होवून थेट नागपूरला थांबणार होती. यामुळे ते घाबरून गेले होते. त्यांनी वर्धा स्थानकावर गाडीची गती कमी झाल्याने थेट रेल्वे फलाटावर उडी मारली. यावेळी रेल्वे फलाटावर कार्यरत असलेल्या रेल्वे पोलीस शिपाई समाधान गवई, विपीन दातीर यांनी उडी घेताच दोघांनाही रेल्वेच्या दूर ओढले. यामुळे या दोघांचे प्राण वाचले. रेल्वेतून उडी घेताच दोघही बेशुद्ध झाले. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार झाल्याने प्राण बचावले. सध्या या दोघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारी सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
यापूर्वीही घडले असे प्रकार
वर्धा रेल्वे स्थानकावर गाडीची गती कमी होताच फलाटावर उड्या मारण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. नागरिकांनी थांबा नसल्यास दुसºया स्थानकावर उतरल्यास जीवितास होणारा धोका टाळणे शक्य असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.