कला महोत्सव कलाकारांसाठी पर्वणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:17 AM2019-01-21T00:17:47+5:302019-01-21T00:18:30+5:30
प्रत्येकाच्या अंगी कलागुण दडलेले असतात, त्याला केवळ चालना देण्याची प्रतीक्षा असते. हीच बाब हेरून कलागुणांचे धनी असलेल्या बालकांसह युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वर्धा कला महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रत्येकाच्या अंगी कलागुण दडलेले असतात, त्याला केवळ चालना देण्याची प्रतीक्षा असते. हीच बाब हेरून कलागुणांचे धनी असलेल्या बालकांसह युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वर्धा कला महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. शहरापुरत्या असलेल्या या महोत्सवाने उत्तरोत्तर व्यापक रूप धारण केले. कालांतराने जिल्हास्तर, विदर्भस्तर तर यावर्षी हा महोत्सव राज्यस्तरावर जाऊन पोहोचला. या महोत्सवात राज्यभरातून विविध स्पर्धेमध्ये तब्बल २ हजार ६९९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे वर्धा कला महोत्सव खऱ्या अर्थाने वर्ध्यातीलच नाही, तर राज्यातील कलाकारांसाठी व्यासपीठ निर्माण करून देणारा ठरला आहे.
वर्ध्यातील लोक महाविद्यालयाच्या प्रांगणावर १० ते १५ जानेवारीपर्यंत वर्धा कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन यावर्षी सेलू तालुक्यातील महिला शेतकरी उद्योजिका सविता येळणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याला स्वागताध्यक्ष आमदार डॉ. पंकज भोयर, खासदार रामदास तडस, नगर पालिकेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, अभ्युदय मेघे, संजय इंगळे तिगावकर, प्रशांत बुरले, वरुण पांडे, अशोक झाडे तर बक्षीस वितरण समारंभाला माजी खासदार दत्ता मेघे, आमदार डॉ. भोयर, संजय इंगळे तिगावकर, अनिल नरेडी, सुनील शिंदे, रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक चौधरी, मोहन अग्रवाल, प्रवीण पेठे यांची उपस्थिती होती. सकाळपासून तर सायंकाळपर्यंत चालणाºया या महोत्सवाचा वर्धेकरांनी लाभ घेतला
या संघटनांचे मिळाले सहकार्य
वर्धा कला महोत्सवाला दत्ता मेघे फाऊंडेशन व वर्धा कला महोत्सव समितीसह विदर्भ साहित्य संघ, गुरुदेव सेवा मंडळ, बहार नेचर फाऊंडेशन, फु टपाथ स्कूल, फें्रड्स कल्चर ग्रुप,साक्षी डान्स क्लासेस, वेदिका डांन्स क्लासेस, आदर्श कोचिंग क्लासेस, प्रगती संगित विद्यालय, कलास्पर्श फाऊंडेशन, कलार्पण संस्था, स्कूल आॅफ स्कॉलर, विदर्भ माध्यमिक मुख्याध्यापक संघ, श्री नामदेव बहुद्देशिय संस्था, उर्ष:काळ सेवा सदन आणि इतरही काही संस्था व नवयुवक-युवतींच्या सहकार्याने हा कला महोत्सव यशस्वी होत आहे.
कला महोत्सवाचा तप पूर्ण
दादाजी धुनिवाले यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त दादाजी धुनिवाले देवस्थानाच्या सभागृहात महोत्सवाचे बीज रोवले गेले. या महोत्सवात दादाजी धुनिवाले देवस्थान आणि वर्धा कला महोत्सव समितीचा सहभाग असायचा. त्यानंतर दत्ता मेघे फाऊंडेशन आणि इतर संस्थांचा सहभाग मिळाला. या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार डॉ. पंकज भोयर यांची निवड झाल्यानंतर स्वरूप व्यापक झालं. याला माजी खासदार दत्ता मेघे यांचेही भरीव सहकार्य मिळत आहे. हा महोत्सव सभागृृहातून नंतर केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर घेण्यात आला. मागील चार ते पाच वर्षांपासून लोक महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात येत आहे. पाहता-पाहता या महोत्सवाला यावर्षी बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. या महोत्सवातून अनेक कलाकार घडले असून त्यांनी विविध स्पर्धेत आपले नावही उंचावले आहे.
सहा दिवस भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी
केवळ स्पर्धा घेऊन व्यासपीठ उपलब्ध करुन देणे याही पलीकडे जात आयोजकांनी नागरिकांचे मनोरंजन आणि जिभेचे चोचले भागविण्याचीही व्यवस्था या महोत्सवात केली. १० जानेवारीपासून सुरु झालेल्या या महोत्सवाची १५ जानेवारीला सांगता करण्यात आली. सहा दिवस चालेल्या या महोत्सवात विविध स्पर्धांसह शिव गर्जना ढोल ताशा पथकाचे सादरीकरण, योग प्राणायम शिबीर, सामुहिक ग्रामगीता वाचन, विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन, बालकुमार साहित्य व कला संमेलन, लोककला सादरीकर, पथनाट्य सादरीकरण, शैक्षणिक मार्गदर्शन व चर्चासत्र, वाचन कट्टा, संगित वाद्य वादन कार्यक्रम घेण्यात आले. तसेच बालकांसाठी विविध खेळणी तर स्वादिष्ट पदार्थांची दुकाने आणि वस्तूंचीही दुकाने थाटण्यात आली होती.
यशस्वी महोत्सव हा तीन महिन्यांच्या धडपडीचे फलित
वर्ध्यातून सुुरू झालेला कला महोत्सव आता राज्यस्तरीय झाल्याने या महोत्सवाच्या आयोजनाकरिता तब्बल तीन महिने परिश्रम घेतले जातात. महोत्सवापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात आॅडिशन घेतले जाते. यावर्षीच्या महोत्सवात यवतमाळ, अमरावती, अकोला, औरंगाबाद, नाशिक, भुसावळ, पुणे व मुंबई येथील २ हजार ६९९ स्पर्धक सहभागी झाले होते. प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यांना रोख पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. सोबतच सहभागी झालेल्यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. सर्वच स्पर्धेकरिता जवळपास दीड लाखाचे पुरस्कार देण्यात आले. आयोजनाकरिता समितीचे अध्यक्ष संदीप चिचाटे, सचिव अजय झाडे, सहसचिव पवन राऊत, नरेंद्र लोणकर, गौरव आेंकार, रसिक जुमडे, जीवन बागडे, प्रफुल्ल गायकवाड, दिलीप रोकडे, नितीन पोहणकर, आशीष पोहाणे, विजय बाभूळकर, प्राजक्ता मुते, मोहित सहारे, अजय ठाकरे, संजय इंगळे तिगावकर, अशोक झाडे, अभिलाष दाहुले, प्रशांत बुरले, वरुण पांडे, अजय देशपांडे यांच्यासह अनेक युवक-युवतींनी परिश्रम घेतले.