सणोत्सव; ड्रायफूडचे भाव भिडले गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:50 PM2019-08-20T23:50:08+5:302019-08-20T23:51:20+5:30
नारळी पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने सण-उत्सवांना प्रारंभ होतो. या काळात सुकामेव्याचे दर वधारतात. यंदाच्या दरवाढीवर मात्र पाकिस्तानसोबत व्यापार बंद करण्यात आल्याचा परिणाम दिसून येत आहे. अंजीर, अक्रोडचे दर हजारपार असून खारिकच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नारळी पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने सण-उत्सवांना प्रारंभ होतो. या काळात सुकामेव्याचे दर वधारतात. यंदाच्या दरवाढीवर मात्र पाकिस्तानसोबत व्यापार बंद करण्यात आल्याचा परिणाम दिसून येत आहे. अंजीर, अक्रोडचे दर हजारपार असून खारिकच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. दिवाळीदरम्यान ही दरवाढ अधिक गतिमान होईल, असे चित्र आहे.
सणावाराला आनंद साजरा करण्यासाठी परस्परांना भेटवस्तू देण्यापेक्षा सुक्यामेव्याची पाकिटे भेट देण्याची प्रथा अलीकडच्या काळात रूढ झाली आहे. परंतु, यंदा या परंपरेला काहीशी खीळ बसण्याची शक्यता आहे. काजू, बदाम, खारीक, अक्रोड या जिन्नसांचे वाढलेले दर पाहता बाजारपेठेत सुक्यामेव्याची विक्री घटण्याची शक्यता आहे. श्रावण महिन्यापासून विविध प्रकारचे सण साजरे करण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरीपूजन, दिवाळी आदींचा समावेश आहे. मागील काही वर्षांमध्ये दिवाळीच्या फराळात सुक्यामेव्याचा वापर वाढला आहे. पण, यासोबतच सुकामेवा भेट म्हणून देण्यालाही विशेष महत्व आहे. त्यामुळे दिवाळीच्या हंगामात घाऊक बाजारात किरकोळ विक्रेत्यांसह, ग्राहकांचीही खरेदीसाठी गर्दी उसळते. परंतु, दरवाढीमुळे यंदा हे चित्र बदललेले दिसू शकते. आपल्याकडे येणारा सुकामेवा हा अफगाणिस्तानमधून पाकिस्तानमार्गे येतो. भारताने पाकिस्तानशी व्यापार थांबविल्यामुळे अफगाणिस्तानातून येणारी सुकामेव्याची आवक प्रभावित होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
यामध्ये प्रामुख्याने खजूर, खारीक, अक्रोड, बदाम यांचा समावेश आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकामेव्याच्या दरांमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत दर अधिक वाढल्यास त्याचा परिणाम विक्रीवर होणार आहे.
किसमिस आवाक्यात
सुकामेव्यातील किसमिस हा पदार्थ बाहेर देशातून तसेच नाशिक येथून मोठ्या प्रमाणात येतो. आपल्याकडे नाशिक येथून येणाऱ्या स्थानिक किसमिसला चांगली मागणी असते. त्यामुळे किसमिसचे दर सामान्यांच्या आवाक्यात आहेत. तर खारिकचे दर दुप्पट झाले आहेत. १७५ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणारी खारिक आता ३५० रुपयांना विकली जात आहे.