पूर्ती साखर कारखाना वसाहतीत युवकावर प्राणघातक हल्ला
By admin | Published: October 5, 2014 11:09 PM2014-10-05T23:09:50+5:302014-10-05T23:09:50+5:30
घरी आराम करत असलेल्या युवकाला बाहेर बोलावून त्याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना जामनी येथील पुर्ती सहकारी साखर कारखानाच्या वसाहतीत रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.
आकोली : घरी आराम करत असलेल्या युवकाला बाहेर बोलावून त्याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना जामनी येथील पुर्ती सहकारी साखर कारखानाच्या वसाहतीत रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. रॉबीन बोस असे जखमी युवकाचे नाव आहे. हा हल्ला नेमका कुणी केला हे अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणी पोलिसात मात्र तक्रार दाखल करण्यात आली नाही.
सविस्तर वृत्त असे की, मुळचा पश्चिम बंगाल येथील रॉबीन बोस हा पुर्ती साखर कारखान्यात फिटर या पदावर काम करीत आहे. तो त्याच्या परिवारासह कारखान्याच्या वसाहतीत वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री ८ वाजता तो कामावरून घरी आला. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास त्याच्या घरच्या दरवाजावर कुणीतरी थाप मारत रॉबीनभाऊ घरात आहे का अशी विचारणा केली. रॉबीनने दरवाजा उघडताच चेहऱ्याला रूमाल बांधून बांधलेल्या तीन इसमानी त्याच्यावर धारदार तलवारीने प्रहार केला. यात त्याच्या उजव्या हाताची रक्तवाहिनी तुटली. तसेच डोक्यावर व मानेवर तलवारीचे जबर घाव बसले. पत्नीने लगेच धाव घेत त्यांना सोडविले. त्यांची पत्नी येताच हल्लेखोरांनी तत्काळ पळ काढला. शेजाऱ्यांच्या मदतीने रॉबीनला वर्धेच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपल्यावर पुन्हा हल्ला होईल या भीतीने रॉबीन याच्या कुटुंबीयांनी अद्याप पोलिसात तक्रार दाखल केली नसल्याचे सांगितले जाते. जखमीला पत्नी व तीन वर्षांचा मुलगा आहे. हा हल्ला कुठल्या कारणाने झाला हे अद्याप कळू शकले नाही. हा वाद जुन्या वैमनस्यातून झाला असल्याचा संशय परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.(वार्ताहर)