औद्योगिक वसाहतीतील संवेदनशील भागात भीषण आग; ४ तासांनंतर आगीवर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 01:26 PM2022-03-23T13:26:32+5:302022-03-23T13:29:26+5:30
हवेचा जोर असल्याने ही आग काही वेळातच सगळीकडे पोहचली.
देवळी(प्रतिनिधी)- स्थानिक औद्योगिक वसाहत परिसरातील कारखान्यांना पाणीपूरवठा करणाऱ्या वॉटर प्लांटच्या सभोवताल तसेच या परिसरातील २५ एकराच्या आरक्षित जागेतील गवताला भीषण आग लागून वणवा पेटला. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास औद्योगिक वसाहतीतील संवेदनशील भागात ही आग लागल्याने एकच हाहाकार माजला. पॉवरग्रीडच्या भागाकडून ही आग लागुन पाहता पाहता संजय इंडस्ट्रीज जिनिंगपर्यंत पोहचली.
हवेचा जोर असल्याने ही आग काही वेळातच सगळीकडे पोहचली. काही मजुरांच्या माहितीवरून शिवसेनेचे अनंत देशमुख, माजी नप उपाध्यक्ष प्रा नरेंद्र मदनकर व नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख यांनी सूत्रे हलविली. देवळी व वर्धा नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. पॉवर ग्रीड, जिनिंग फॅक्टरी व ऑक्सिजन प्लांट च्या संवेदनशील भागात ही आग लागल्याने तहसीलदार राजेश सरवदे यांनी घटनास्थळ गाठुन निर्देश दिले.
वॉटर प्लांटच्या २५ एकराचे परिसरात जंगल वाढले आहे. औद्योगिक वसाहत प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे हा भाग बाभूळ, बोर तसेच इतर वनस्पती व गवताने व्यापला आहे.अग्निशामक दलाच्या दोन्ही गाड्यांनी अथक परिश्रम करून ही आग आवाक्यात आणली. ही घटना रात्रीची असती तर नक्कीच अनर्थ घडला असता अशी भावना लोकांनी व्यक्त करून एमआयडीसी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. तसेच भागात आवश्यक सुविधां पुरविण्यात याव्या अशी मागणी केली.
औद्योगिक वसाहत परिसरात वाढलेले गवत तसेच झाडे तोडण्याचे व इतर मेंटनन्सचे काम आमचे नाही. वसाहतीचा पाणीपुरवठा पॉवर ग्रीडमधील सम मधून केला जात आहे. त्यामुळे आगीच्या घटनास्थळी असलेली वॉटर टॅंक निकामी पडली आहे.- मोहन व्यास, डेप्युटी इंजिनिअर,औद्योगिक वसाहत, वर्धा