पन्नाशी गाठलेले पोलीसदादा करणार कार्यालयीन कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 05:00 AM2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:00:06+5:30

मागील महिनाभरापासून कोरोना विषाणूने देशभरता थैमान घातले आहे. नेमणुकीस असलेल्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच काही ठिकाणी कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे. यामध्ये विशेषत: ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लागण होण्याचा धोका आहे.

Fifty-year-old policemen will do office work | पन्नाशी गाठलेले पोलीसदादा करणार कार्यालयीन कामकाज

पन्नाशी गाठलेले पोलीसदादा करणार कार्यालयीन कामकाज

Next
ठळक मुद्देकोरोनाची धास्ती : पोलीस अधीक्षकांचे सर्व कार्यालय प्रमुखांना आदेश

चैतन्य जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक अधिकारी व कर्मचारीदेखील कोरोनाने बाधित झाले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या २८ एप्रिलच्या पत्रान्वये पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी जिल्हा पोलीस दलातील पन्नाशी ओलांडलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केवळ कार्यालयीन कर्तव्य नेमूण देण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांना दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांमधील ५०-५५ वयोगटातील सुमारे सुमारे ८० पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील महिनाभरापासून कोरोना विषाणूने देशभरता थैमान घातले आहे. नेमणुकीस असलेल्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच काही ठिकाणी कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे. यामध्ये विशेषत: ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा वयोगटातील पोलिसांना आता कार्यालयीन किंवा जनतेशी संपर्क येणार नाही अशा ठिकाणी डयूटी देण्यात यावी, त्यांना सॅनिटायझर, मास्क व इतर साधनसामुग्री उपलब्ध करून देण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांनी सर्व कार्यालयप्रमुखांना दिले आहेत. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतील तब्बल ८० च्या जवळपास कर्मचाऱ्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे. त्यामुळे ५० वर्षे वय असलेल्यांना कार्यालयीन कामकाज करण्याचे आणि ५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना रजा देण्यात आली आहे.
आवश्यक असल्यास मिळणार रजा
वयाची पन्नाशी ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये विशेषत: मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व रक्त वाहिन्यांसंदर्भात समस्यांचे प्रमाण अधिक असते. त्यातच कामाचा ताणतणाव, वरिष्ठांचा दबाव व घरापासून कोसो दूर राहावे लागत असल्याने पोलिसांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उपरोक्त आजाराने ग्रस्त असलेल्या पोलिसांनी सुटी मागितल्यास त्यांची रजा तत्काळ मंजूर करण्यात येत आहे.

वेतन कपातीचाही फटका
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रस्त्यावर उतरून दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाºयांना वेतन कपातीचाही फटका सहन करावा लागातो आहे. जीवाची पर्वा न न करता पोलीस कर्मचारी जोखीम पत्कारून, कुटुुुंबापासून दूर राहून आपले कर्तव्य निभवत आहे. पण, त्यांची ३० टक्के वेतन कपात केल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

१३ पोलीस कर्मचारी सक्तीच्या रजेवर
शहर पोलीस ठाण्यातील ५५ वर्षे वयोगटावरील तब्बल १३ कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. तर ५० वर्षे वयोगटातील पोलिसांना कार्यालयीन कामकाज देण्यात आले आहे. सावंगी ठाण्यातील एक कर्मचारी रजेवर पाठविणार तर एका कर्मचाऱ्यास कार्यालयीन कामकाज देणार आहे. रामनगर पोलीस ठाण्यातील ५० वर्षे वयोगटात येणाऱ्या १५ पोलिसांना कार्यालयीन कामकाज देण्यात आले आहे. सेवाग्राम पोलीस ठाण्यातील एक कर्मचाºयाला रजेवर पाठविण्यात आले आहे तीघांना कार्यालयीन कामकाज देण्यात आल्याची माहिती शहर, रामनगर, सावंगी आणि सेवाग्राम येथील ठाणेदारांनी दिली.

जरा आमच्याही वेदना समजून घ्या
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मागील ४७ दिवसांपासून पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरून लढा देत आहेत. कुणी आपले मुलबाळ, वृद्ध आई-वडिल, आजारी पत्नी तर काही आपल्या कुटुंबांपासून कोसो दूर आहे. स्थानिक पोलीस कर्मचारी घरी गेले तर त्यांना आपल्या मुलाबाळांच्या जवळ जाता येत नाही, एकांतात राहून एका खोलीत स्वत:ला बंद करावे लागते, त्यामुळे आमच्या व्यथा कोण जाणत आहे, आम्ही नागरिकांची सुरक्षा करतो पण, आज आमचीच सुरक्षा धोक्यात आली असल्याचे अनेक पोलीस कर्मचारी सांगत होते.

ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आहे अशा ५५ वर्षे वयोगटाखालील सर्व पोलीस कर्मचाºयांना रजेवर पाठविण्यात आले आहे. तर ५० वर्षे वयोगटातील पोलिसांना कार्यालयीन कामकाज देण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षकाखालील दर्जावर असलेल्या जल्ह्यातील सुमारे ८० च्या जवळपास पोलिसांना कार्यालयीन कामकाज तसेच काहींना रजेवर पाठविण्यात आले आहे.
- डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक वर्धा.

Web Title: Fifty-year-old policemen will do office work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.