लढवय्ये मैदानात, आता प्रचार तोफांचा मारा सुरू
By admin | Published: October 3, 2014 02:03 AM2014-10-03T02:03:05+5:302014-10-03T02:03:05+5:30
छानणीत नामांकन रद्द आणि नामांकन परत घेण्याचे सोपस्कार बुधवारी पार पडल्यामुळे निवडणुकीच्या रणांगणात ६९ लढवय्ये एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत.
राजेश भोजेकर वर्धा
छानणीत नामांकन रद्द आणि नामांकन परत घेण्याचे सोपस्कार बुधवारी पार पडल्यामुळे निवडणुकीच्या रणांगणात ६९ लढवय्ये एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. या महासंग्रामाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असून प्रचारतोफांचा माराही सुरू झाला आहे. एकेकाळचे मित्रही मैदानात असल्याने कोण कोणाला पटकणी देतो. याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. अपक्षांचेही बारीकसारीक हल्ले आलेच. यामुळे दिग्गजांचा चांगलाच कस लागणार आहे. कार्यकर्ते प्रचार साहित्य घेऊन सज्ज झाले आहेत. प्रचार वाहनेही क्षेत्रात फिरायला लागली असून निवडणुकीची वातावरण निर्मिती सुरू झालेली आहे. प्रचारात कोण आघाडी घेतो, यावरही बरेच काही अवलंबून असल्यामुळे प्रत्येक उमेदवार त्या दृष्टीने धडपडताना दिसून येत आहे.
वर्धेत बहुरंगी चित्र
नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या वर्धा मतदार संघात सर्वाधिक २१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १४ उमेदवार विविध राजकीय पक्षांचे असून सात अपक्ष उमेदवारांचा समावेश आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी दिग्गजांना निवडणूक रिंगणात उतरविल्यामुळे बहुरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. युती तुटल्यामुळे या मतदार संघात भाजप पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहे. यामुळे मतांचे गणित मांडणे कठिण झाले असले तरी सर्वच राजकीय पक्षांच्या मतांची ताकत बघता कोण बाजी मारणार हे सांगणे अवघड आहेत.
देवळीत मतांचे विभाजन दिग्गजांची डोकेदुखी
देवळी मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागून आहे. या मतदार संघात १९ उमेदवार एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने मनसे बाद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात असल्यामुळे काँग्रेस आणि भाजपपुढे कडवे आव्हान आहे. सर्वाधिक नऊ अपक्ष रिंगणात असल्यामुळे मतांचे विभाजन दिग्गजांचे गणित बिघडवणार, असे सध्याचे चित्र आहे.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेचे आव्हान
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगणघाट मतदार संघात शिवसेनेपुढे मनसेच्या रुपाने कडवे आव्हान आहे. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा झाल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. त्यातच भाजपा पहिल्यांदाच या निवडणुकीला सामोरे जात असून गेल्या निवडणुकीत अपक्ष असलेल्या उमेदवाराला तिकीट दिली. अपक्ष असताना चोहोबाजूने सदर उमेदवाराला मते मिळाली होती. आता भाजपचे नाव सदर उमेदवारापुढे लागल्यामुळे अनेक मतदार संभ्रमात पडले आहेत. हा मतदार संघ २००९ मध्ये राष्ट्रवादीने सेनेकडून हिरावून घेतला होता. राष्ट्रवादीही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जात आहे. आघाडीनंतर काँग्रेस पहिल्यांदाच ही निवडणूक लढत असल्यामुळे येथे निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. पाच अपक्ष उमेदवारही रिंगणात असून ते कोणाचे गणित बिघडवते, याकडे लक्ष लागले आहे.
काँग्रेस-भाजपातील सरळ लढतीला अपक्ष व राकाँमुळे नवा रंग
आर्वी मतदार संघात काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ लढतीचा इतिहास आहे. यावेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असल्यामुळे मतांचे विभाजन आलेच. यात आठ अपक्ष उमेदवारांनी भर घातली आहे. पंचायत समित्यांमध्ये भाजपची राष्ट्रवादीसोबत गट्टी असल्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत प्रहार संघटना भाजपसोबत होती. या निवडणुकीत प्रहारने अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील पारंपरिक सरळ लढतीला नवा रंग चढणार आहे.