मुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:46 PM2018-05-13T23:46:52+5:302018-05-13T23:46:52+5:30

पवनार येथील अनूसया चकोले या अतिक्रमणधारक महिलेचा घर पडल्याने भिंतीखाली दबून मृत्यू झाला. अतिक्रमणधारकांना नि:शुल्क जमिनीचे पट्टे देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते; पण कुठलीही कार्यवाही केली नाही.

File a human rights complaint on the Chief Minister | मुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘युवा परिवर्तन की आवाज’ची मागणी : अतिक्रमणधारकांचे ठाणेदारांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पवनार येथील अनूसया चकोले या अतिक्रमणधारक महिलेचा घर पडल्याने भिंतीखाली दबून मृत्यू झाला. अतिक्रमणधारकांना नि:शुल्क जमिनीचे पट्टे देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते; पण कुठलीही कार्यवाही केली नाही. यामुळे अनूसया हिच्या मृत्यूला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाजने केली. याबाबत सेवाग्रामचे ठाणेदार राजू मेंढे यांना निवेदन देण्यात आले.
अतिक्रमण धारकांना कायम घरपट्टे मिळावे म्हणून वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांनी वर्धा ते नागपूर पायदळ भू-देव यात्रा काढत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यावेळी त्वरित योग्य कार्यवाहीची ग्वाही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली होती; पण भू-देव यात्रा काढून अवधी लोटूनही संबंधित यंत्रणेणे कार्यवाही केली नाही. अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे न दिल्याने त्यांना शासनाच्या घरकूल व अन्य योजनांचा लाभ घेता येत नाही. असाच काहीसा प्रकार अतिक्रमणधारक मृतक अनूसया हिच्याशी घडला. तिला पक्के घर बांधण्यासाठी शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही. यातच शुक्रवारी रात्री सदर कुटुंब झोपेत असता घर कोसळले. यात तिचा मृत्यू झाला तर अन्य कुटुंबीय जखमी झाले.
पक्के घरे नसल्याने अनेक अतिक्रमणधारकांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. अनूसया सारखे आणखी किती बळी भाजपा सरकार घेणार, असा संतप्त सवालही युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. पवनार येथील वयोवृद्ध महिला अनूसया चकोले यांच्या मृत्यूला मुख्यमंत्री खुद्द जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध त्वरित मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. सदर आंदोलनाचे नेतृत्व युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, पलाश उमाटे यांनी केले. आंदोलनात समीर गिरी, गौरव वानखडे, अभिषेक बाळबुधे, सोनू दाते, अक्षय बाळसराफ, सौरभ माकोडे, शेखर इंगोले, आकाश बोरीकर, अक्षय वानखडे, राकेश गौरखेडे, प्रेमा बरगट, चंदा ठाकरे, संगीता कोहळे यासह अतिक्रमणधारक सहभागी झाले होते.
अन्यथा तीव्र आंदोलन
वयोवृद्ध अनूसया यांचा मृत्यू झाला नसून मुख्यमंत्र्यांच्या चुकीमुळेच त्यांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्र्यांकडून अतिक्रमण धारकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस दोषी आहेत. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. येत्या काही दिवसांत अतिक्रमण धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारने कार्यवाही न केल्यास युवा परिवर्तन की आवाज अतिक्रमण धारकांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला. मृतकाच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
शिवाजी चौक ते सेवाग्राम पोलीस स्टेशन, असा अतिक्रमण धारकांचा मोर्चा काढण्याचे युवा परिवर्तन की आवाजने जाहीर केले होेते. सदर मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळी ११ वाजतापासून शिवाजी चौकात अतिक्रमणधारकांनी गर्दी केली; पण ऐनवेळी काही पोलीस अधिकाºयांनी शिवाजी चौक गाठत सध्या आचार संहिता आहे. यामुळे मोर्चा काढू नका, तसे केल्यास गुन्हे दाखल होतील, असे सांगत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला; पण त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचना लक्षात घेत मोर्चा न काढता थेट सेवाग्राम पोलीस ठाणे गाठून अतिक्रमण धारकांनी विविध मागण्यांचे निवेदन ठाणेदार राजू मेंढे यांना सादर केले.

आंदोलनकर्त्यांचे निवेदन आपण स्वत: स्वीकारले आहे. त्यांनी निवेदनातून पवनार येथील अनूसया चकोले यांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सदर प्रकरणी वरिष्ठ अधिकाºयांच्या सूचनेवरून पुढील कारवाई केली जाईल.
- राजू मेंढे, ठाणेदार, पो.स्टे. सेवाग्राम.

Web Title: File a human rights complaint on the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.