स्टेट बँकेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 05:00 AM2020-06-08T05:00:00+5:302020-06-08T05:00:21+5:30
सध्या तालुक्यातील शेतकरी चातकासारखे पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. इतकेच नव्हे तर पीककर्ज मिळावे म्हणून त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. परंतु, बँकेच्या अधिकाऱ्यांच्या हेकेखोर धोरणामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी एकत्र येत कोरा येथे मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील निंभा येथील स्टेट बँक तसेच कोरो व नंदोरी येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेतून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने कोरो येथे सुमारे २०० शेतकऱ्यांनी बँकांच्या गलथान कारभाराच्या विरोधात मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांनी घेत बँकेच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. शिवाय निंभा येथील स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या तालुक्यातील शेतकरी चातकासारखे पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. इतकेच नव्हे तर पीककर्ज मिळावे म्हणून त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. परंतु, बँकेच्या अधिकाऱ्यांच्या हेकेखोर धोरणामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी एकत्र येत कोरा येथे मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. ही बाब आ. समीर कुणावार यांच्या लक्षात येताच त्यांनी दखल घेत याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांना दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. ओम्बासे, उपविभागीय महसूल अधिकारी चंद्रभान खंडाईत या प्रमुख अधिकाऱ्यांनी नंदोरी, निंभा व कोरा येथील बँक गाठून बँकेच्या अधिकाऱ्यांना पीककर्ज वितरीत करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या याच दौऱ्यादरम्यान निंभा येथील स्टेट बँकेचे व्यवस्थापक दोन महिन्यांत नागपूर येथून केवळ एकच वेळा बँकेत आल्याचे पुढे आले. बँकेचे व्यवस्थापकच बँकेत येत नसल्याने पीककर्जाचे प्रकरणे प्रलंबीत असल्याचे व त्याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना तहसीलदार राजू रणवीर यांना अधिकाऱ्यांनी दिल्या. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करून भारतीय स्टेट बँक निभा शाखेचे व्यवस्थापक गजभिये यांच्याविरुद्ध कलम १८८, २६९, २७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.