गणित-विज्ञानच्या ४२ जागा भरणार
By admin | Published: May 10, 2017 12:36 AM2017-05-10T00:36:13+5:302017-05-10T00:36:13+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळांत गणित आणि विज्ञानाचा भार समाजशास्त्राच्या शिक्षकांवर आहे. ते तो पेलतही आहेत
पूर्ण जागा भरल्यास समाजशास्त्राचे शिक्षक ठरणार अतिरिक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषदेच्या शाळांत गणित आणि विज्ञानाचा भार समाजशास्त्राच्या शिक्षकांवर आहे. ते तो पेलतही आहेत. दरम्यान शासनाच्या आदेशानुसार या जागांवर शिक्षकांतूनच बारावी किंवा बीएससी विज्ञान असलेल्या शिक्षकांना नियुक्त करण्याच्या सूचना आल्या. यानुसार कारवाई केल्यास जिल्ह्यात समाजशास्त्राचे १९० शिक्षक अतिरिक्त ठरतात. हे शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यांच्या समायोजनाची समस्या निर्माण होणार असे म्हणत शिक्षण विभागाकडून पूर्णत: रिक्त असलेल्या ४२ जागा भरण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे.
सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांत समाजशास्त्राच्या शिक्षकांकडून गणित आणि विज्ञान विषय शिकविल्या जात आहे. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना शिकविण्यातही येत आहे. आता नव्या आदेशानुसार कारवाई केल्यास त्यांच्यावर अतिरिक्त होण्याची वेळ येणार आहे. मग ज्या वेळी शासनाला गरज होती त्यावेळी ती आम्ही भागविली ही आमची चूक होती काय, असा सवाल या शिक्षकांनी केला. याला जिल्ह्यातील शिक्षकांच्या संघटनांनीही सहकार्य केले. यावरून सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांच्या कक्षात सभा झाली. ही सभा या विषयावर चांगलीच गाजली. शिक्षकांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर अतिरिक्त होण्याची वेळ येणार नाही, असे ठरविण्यात आले. जिल्ह्यात त्या शाळेत गणित आणि विज्ञानाचे शिक्षक नसतील अशा एकूण ४२ शाळांतच गणित शिक्षकांची नियुक्ती करण्याचे ठरविण्यात आले.
या सभेला मुख्यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी किसन शेंडे, प्राथमिक शिक्षक संघाचे लोमेश वऱ्हाडे, शिक्षक समितीचे विजय कोंबे यांच्यासह अनेक समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या जागा भरल्यास अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची समस्या निर्माण होणार असल्याने सुरू असलेले काम तसेच सुरू ठेवावे असा निर्णय घेण्यात आला. शिवाय याच विषयाचा अतिरिक्त भार असलेल्या तब्बल ४६ शिक्षकांचेही समायोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
२१ सहायक शिक्षक झाले मुख्याध्यापक
शिक्षण कायद्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांतील तब्बल ५४ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरविण्यात आले होते. त्यांना सहायक शिक्षकांचा दर्जा प्रदान करण्यात आला होता. यावर आता निर्णय झाला असून यातील तब्बल २१ शिक्षकांना परत मुख्याध्यापकाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांना दिलेल्या गावी तत्काळ रूजू होण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
विषय शिक्षकांच्या नियुक्तीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठक झाली. या बैठकीत स्थिती जैसे थे ठेवण्याचा निर्णय झाला. यात रिक्त असलेल्या ४२ जागा भरणार आहे. यामुळे कोणताही शिक्षक अतिरिक्त ठरणार नाही. पदभार असलेल्या ४६ शिक्षकांचेही समायोजन करण्यात येणार आहे.
- किसन शेंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), वर्धा.