१० वर्षांपूर्वी दिले होते फिल्टर
By admin | Published: March 26, 2016 02:04 AM2016-03-26T02:04:54+5:302016-03-26T02:04:54+5:30
जिल्ह्यातील बऱ्याच अंगणवाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. येथे येणाऱ्या चिमुकल्यांना घरूनच पाणी आणावे लागत आहे.
शुद्ध पाण्याअभावी चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात
वर्धा : जिल्ह्यातील बऱ्याच अंगणवाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. येथे येणाऱ्या चिमुकल्यांना घरूनच पाणी आणावे लागत आहे. १० वर्षांपूर्वी काही निवडक अंगणवाड्यांना वॉटर फिल्टर देण्यात आले होते; मात्र ते कुठल्या अंगणवाड्यांना वाटप केल्या गेले याची माहिती जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाकडे नाही. यामुळे हे फिल्टर खरच अंगणवाड्यांना की ते कागदावरच होते याचा शोध घेणे गरजेचे आहे.
अंगणवाडीला पाणी पुरविण्याची जबादारी ग्रामपंचायतीकडे आहे. यावर ग्रामपंचायतीला १० टक्के निधी खर्च करावा लागतो. मात्र त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. जिल्ह्यातील १,२८१ अंगणवाडी असून १७६ मिनी अंगणवाडी आहे. १,२८१ पैकी ३८ अंगणवाडी भाडेतत्वावर आहेत. यातील काही अंगणवाडी जि.प. शाळेच्या इमारतीमध्ये भरवल्या जात आहेत.
अंगणवाडी इमारतीचा प्रश्न असताना विद्यार्थ्यांना शुध्द पाणी मिळत नाही. यामुळे अंगणवाड्यांतील चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंगणवाडीतील मुलांना पुरविण्यात येत असलेले पाणी शुद्ध करण्याकरिता गतवर्षीपासून ‘जीवन ड्रॉप’ आणण्यात येत आहे; मात्र त्या ड्रॉपवरही वैधता दिनांक नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अशुद्ध पाणीच पिण्याकरिता देण्यात येत असल्याची चर्चा जोरात आहे. काही अंगणवाडीतील ग्राम पंचायतीने नळ दिले आहे. कुठे हातपंप तर काही ठिकाणी विहिरीचे पाणी आहे. यामुळे या समस्येकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अंगणवाडीच्या ३८ इमारती भाडेतत्त्वावर
अंगणवाडीच्या इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. एकूण ३८ अंगणवाड्या अद्यापही भाडे तत्वावर सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
भाडेतत्त्वावर असलेल्या १५ अंगणवाड्यांचे काम तांत्रिक अडचणीमुळे अर्धवट रखडले आहे. अंगणवाडी बांधकाम निधी राज्य शासनामार्फत येत असून ग्राम पंचायतीला जमा होतो. यामुळे कामाला पाहिजे तशी गती मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी येथे सुविधांची आणवा असल्याचे दिसून येत आहे.