मशागतीची कामे अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 10:26 PM2019-06-07T22:26:18+5:302019-06-07T22:27:05+5:30
उन्हाची तमा न बाळगता बळीराजा राबतच असतो, नांगरणी, वखरणी, रोटावेटर, करून धुऱ्यांची साफसफाई सह शेतीची कामे अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येते. व धुळपेरणी तथा खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांची शेत सज्ज झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : उन्हाची तमा न बाळगता बळीराजा राबतच असतो, नांगरणी, वखरणी, रोटावेटर, करून धुऱ्यांची साफसफाई सह शेतीची कामे अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येते. व धुळपेरणी तथा खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांची शेत सज्ज झाली आहे.
दोन तीन वर्षापासून कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळी आक्रमण करीत असल्याने कापूस उत्पादनात घट आल्याचे दिसून येते. तरीपण ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे म्हणून धुळपेरणीच्या तयारीत असल्याचे दिसून येते. मृग नक्षत्र केवळ दोन दिवसावर आल्यामुळे शेतकरी कपाशी लागवडीकरिता धावपळ करीत असल्याचे चिकणी व परिसरामध्ये दिसून येते.
चिकणी शिवारात ओलिताखाली असलेल्या शेतात काही शेतकऱ्यांना कपाशीची लागवड करण्याकरिता शेतात स्प्रिंकलरद्वारे सिंचन सुरू केले आहेत. शेताचे सिंचन केल्यानंतर कपाशीची लागवड करण्यात येणार असल्याचे शेतकरी सांगतात.
कोरडवाहू शेतकऱ्यांनी लागवड करू नये
कोरडवाहू शेतकऱ्यांची विशेष धावपळ दिसत नाही, कारण हवामान खात्याचा अंदाजानुसार जिल्ह्यात मान्सून उशिराच दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहेत. यावर्षी मात्र कोरडवाहू शेतकरी मान्सून आल्याशिवाय कपाशीची लागवड करणार नसल्याचेच चित्र दिसून येते. कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घाई करू नये असे कृषी विभागाने सांगितले आहे. पाऊस लांबल्यास धुळपेरणी केलेल्या शेतकऱ्यासमोर संकट निर्माण होऊ शकते अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाºयांनी दिली आहे.
मान्सूनचा पाणी आल्याशिवाय यावर्षी कपाशीची लागवड करणे धोक्याचेच ठरेल. बियाणे सुद्धा महागले आहेत. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच कपाशी लागवड केल्या जाईल.
अतुल देशमुख, शेतकरी, चिकणी