अखेर फेडरेशनला मिळाला ३० कोटी रुपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 06:00 AM2019-12-05T06:00:00+5:302019-12-05T06:00:19+5:30
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केली जाते. यंदा ४ नोव्हेबरपासून शासकीय धान खरेदीला सुरूवात झाली.मागील महिनाभरात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने २ लाख ९३ हजार क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने १ लाख १० हजार क्विंटल धान खरेदी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून मागील महिनाभरापासून धान खरेदीला सुरूवात होऊन सुध्दा ५३ कोटी रुपयांचे चुकारे मिळाले नव्हते. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. लोकमतने सुध्दा शेतकऱ्यांचे ५३ कोटी रुपयांचे चुकारे थकल्याची बाब लावून धरली होती. आ.विनोद अग्रवाल यांनी सुध्दा शासनाकडे यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर बुधवारी (दि.४) शासनाने तातडीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला चुकारे करण्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला.त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण काही प्रमाणात दूर झाली आहे.
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केली जाते. यंदा ४ नोव्हेबरपासून शासकीय धान खरेदीला सुरूवात झाली.मागील महिनाभरात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने २ लाख ९३ हजार क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने १ लाख १० हजार क्विंटल धान खरेदी केली. धान खरेदीला सुरूवात होण्यापूर्वी दरवर्षी शासनाकडून या दोन्ही विभागांना अॅडव्हांस स्वरुपात निधी उपलब्ध करुन दिला जातो. मात्र यंदा केवळ आदिवासी विकास महामंडळाला निधी उपलब्ध करुन देण्यात आला. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला निधी उपलब्ध करुन न दिल्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाचे चुकारे देण्यास अडचण निर्माण होत होती. शासकीय धान खरेदी केंद्रावर खासगी व्यापाऱ्यांपेक्षा अधीक दर मिळत असल्याने शेतकरी सुध्दा धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करित होती. फेडरेशनने मागील महिनाभरात ५३ कोटी रुपयांची धान खरेदी केली होती. पण यापैकी एकही रुपयाचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले नव्हते. त्यामुळे शेतकरी दररोज चुकारे आले का म्हणून शासकीय धान खरेदी केंद्राच्या पायऱ्या झिजवित होते.लोकमतने सुध्दा शेतकऱ्यांचे ५३ कोटी रुपयांचे चुकारे थकल्याचा मुद्दा लावून धरला होता. तसेच मंगळवारच्या लोकमत हॅलो गोंदियामध्ये यासंबंधीचे वृत्त प्रकाशीत करण्यात आले होते. याचीच दखल शासनाने घेत धानाचे चुकारे करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ३० कोटी रुपयांचा निधी बुधवारी उपलब्ध करुन दिला.त्यामुळे शेतकºयांची मागील महिनाभरापासूनची समस्या मार्गी लागली.
शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करुन सुध्दा महिनाभरापासून धानाचे चुकारे मिळाले नव्हते.त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडे यासंदर्भात समस्या मांडली. याचीच दखल घेत शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. उर्वरित निधी सुध्दा लवकरच उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकºयांना कुठलीही अडचण होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला दिले आहे.
- विनोद अग्रवाल, आमदार गोंदिया.
थकीत ५३ कोटी ७७ लाख रुपयांच्या धानाच्या थकीत चुकाºयांपैकी बुधवारी शासनाने ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. उर्वरित निधी येत्या चार पाच दिवसांत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.शेतकऱ्यांचे थकीत चुकारे लवकरात लवकर करण्यात येईल.
- गणेश खर्चे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी गोंदिया.
उर्वरित रक्कम लवकरच
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आत्तापर्यंत एकूण २ लाख ९३ हजार क्विंटल धान खरेदी केली असून त्याची एकूण किमत ५३ कोटी ७७ लाख रुपये आहे. यापैकी ३० कोटी रुपयांचे चुकारे बुधवारी केले. तर उर्वरित २३ कोटी ७७ लाख रुपयांचे चुकारे येत्या दोन दिवसात करण्यात येणार असल्याची माहिती आहे.