अखेर चौकशी समिती गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 09:32 PM2019-05-05T21:32:18+5:302019-05-05T21:33:31+5:30
पशुसंवर्धनच्या शिपायाने खोटी बतावणूक करून १४ शेतकऱ्यांना २२ लाखांनी गंडा घातल्या प्रकरणी अखेर चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हवालदील शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता २१ एप्रिलला वृत्त प्रकाशित करून सदर प्रकरणावरील पडदा लोकमतने उचलला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : पशुसंवर्धनच्या शिपायाने खोटी बतावणूक करून १४ शेतकऱ्यांना २२ लाखांनी गंडा घातल्या प्रकरणी अखेर चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हवालदील शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता २१ एप्रिलला वृत्त प्रकाशित करून सदर प्रकरणावरील पडदा लोकमतने उचलला होता. याच वृत्ताची दखल घेत जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी ही चौकशी समिती गठीत केली असून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर दोषीवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
७५ टक्के अनुदानावर गाय, म्हशी देण्याची योजना सन २०१८-१९ पासून आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. मात्र, निलंबीत शिपाई गुरनुले याने आष्टी तालुक्यातील १४ शेतकऱ्यांना तब्बल २२ लाखाचा गंडा घातला. याची दखल घेत शिवसेना आर्वी विधानसभा प्रमुख बाळा जगताप यांनी शेतकऱ्यांना घेवून आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याच दरम्यान लोकमतने वृत्त प्रकाशीत करताच पशुसंवर्धन विभागात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर तातडीने २२ एप्रिलला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाºयांनी चौकशी समिती गठीत केली.
यामध्ये जे.एल. वसावे उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती केली. सोबतच पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. व्ही. वंजारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी हेमंत भोयर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी नंदू बोबडे यांचा समावेश आहे. समितीचा अहवाल प्राप्त होताच सदर शिपायाला बडतर्फ करीत त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
गुरनुलेविरुद्ध यापूर्वीही ४२० चा गुन्हा
पशुसंवर्धनचा कर्मचारी नंदकिशोर गुरनुले हा पशुवैद्यकीय दवाखाना पार्डी ता. कारंजा येथे कार्यरत होता. त्याने आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा येथील शेतकऱ्याची फसवणूक केली. त्यावेळी चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्याचा अहवाल १५ जून २०१८ ला प्राप्त झाल्यावर तात्काळ निलंबन करून सेलू येथे बदली झाली होती. त्याच्यावर ९ जुलै २०१८ ला तळेगाव पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, ४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चौकशी समिती गठित करण्यात आली असून अहवाल प्राप्त होताच योग्य कारवाई होईल; पण शेतकºयांनी आता जाणून घेतले पाहिजे की कुठल्याही प्रकारच्या योजना आॅफलाईन नाहीत. शासनाने सर्व योजना आॅनलाईन सुरू केल्या आहे. शेतकºयांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये प्रत्यक्ष जावूनच अर्ज सादर करावा. त्यानंतर सदरचा अर्ज पं.स.स्तरावरील पशुधन विकास अधिकारी विस्तार यांचे शिफारशीने कार्यालयात प्राप्त होतो. योजनानिहाय लाभार्थी निवड समितीद्वारे करून त्याची यादी पुन्हा पं. स. स्तरावर पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येते. गुरनुले यांनी आणखी काहींची फसगत केली असेल तर त्यांनी लेखी तक्रार पशुसंवर्धन विभाग जि.प. वर्धा येथे सादर करावी.
- डॉ. प्रज्ञा गुल्हाणे, पशुसंवर्धन अधिकार, जि.प. वर्धा.
पशुसंवर्धनचा शिपाई नंदकिशोर गुरनुले याने केलेल्या ठगबाजी प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यासाठी चौकशी समिती गठित केली आहे. याच चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच बडतर्फीची कारवाई करण्यात येईल. शिवाय वेळप्रसंगी दोषी शिपायावर फौजदारी कारवाईही करण्यात येईल.
- डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यपालन अधिकारी, जि.प. वर्धा.