अखेर शरद देशमुख यांचे सभासदत्व रद्द
By admin | Published: June 25, 2016 02:10 AM2016-06-25T02:10:49+5:302016-06-25T02:10:49+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाचा शरद देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचे सदस्यत्वही रद्द करण्यात येत ...
वर्धा कृउबा समितीतील प्रकरण : जिल्हा उपनिबंधकांनी दिला निर्णय
वर्धा : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाचा शरद देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचे सदस्यत्वही रद्द करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा उपनिबंधकांनी बुधवारी पारीत केला आहे. त्याची प्रत बाजार समितीला शुक्रवारी देण्यात आली. त्यांनी हा निर्णय महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अनिनियम १९६३ चे कलम १७ व नियम १९६७ च्या ४१ (३) तसेच कृषी व सहकार मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार दिला आहे.
सभापती असताना शरद देशमुख यांच्या विरोधात कामात हयगय करणे, गैरवर्तन करणे आदी कारणे काढत १८ मे २०१६ च्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला. या सभेला स्वत: शरद देशमुख हजर होते. त्यांनीही या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यांच्या विरोधात असलेल्या या ठरावाच्या बाजूने असलेल्या १५ सदस्यांनी तो उपनिबंधक कार्यालयात सादर केला. या ठरावावर चौकशी सुरू असतानाच शरद देशमुख यांना सभापती पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या राजीनाम्यानंतर सभापतीचा प्रभार पांडुरंग देशमुख यांना सोपविण्यात आला. शरद देशमुख यांच्यावर असलेल्या आरोपामुळे त्यांचे सदस्यत्त्व रद्द करण्याची मागणी समितीच्या सभासदांकडून करण्यात आली. या संदर्भात उपनिबंधक कार्यालयाकडून चौकशी केली असता शरद देशमुख यांच्यावर असलेले आरोप सिद्ध झाल्याने त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा आदेश उपनिबंधकांनी पारित केला.(प्रतिनिधी)