अखेर पंचायत समितीने ‘तो’ फाटलेला फलक काढला
By admin | Published: April 4, 2017 01:22 AM2017-04-04T01:22:02+5:302017-04-04T01:22:02+5:30
पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागावर असलेला ‘नागरिकांची सनद’बाबतचा फलक फाटलेला होता.
लोकमत वृत्ताची दखल : डिजिटलऐवजी भिंतीवर रंगणार फलक
सेलू : पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागावर असलेला ‘नागरिकांची सनद’बाबतचा फलक फाटलेला होता. याबाबत ‘लोकमत’ रविवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत पंचायत समितीने तो फाटलेला फलक काढून घेतला.
मागील चार महिन्यांपासून नागरिकांसाठी उपयुक्त असलेल्या माहितीचा नागरिकांची सनद हा फलक दुरवस्थेत दर्शनी भागावर लावलेला होता. यावर एक वर्षापूर्वी बदलून गेलेल्या तथा सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची नावे होती. यामुळे पं.स. मध्ये येणारे नागरिक फलक पाहून अचंबित होत होते. सामान्य प्रशासन विभाग व पंचायत विभागाच्या मधोमध लावलेल्या फलकावर या कार्यालयातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे लक्ष जात असताना १०० ते २०० रुपयांत बनणाऱ्या फलकाला अद्यावत करण्याकडे कानाडोळा केला जात होता; पण रविवारी वृत्त प्रकाशित होताच पंचायत समितीच्या सामान्य प्रशासन विभागाला जाग आली.
सोमवारी कार्यालय सुरू होण्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याकडून तो फलक काढून घेतला. त्याच भिंतीला काळा रंग देऊन फलक तयार करण्यात आला आहे. या फलकावर एक-दोन दिवसांत नव्या रूपात अद्यावत माहिती दिली जाणार असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. फाटलेला फलक बदलण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रतीक्षा का करावी, हा प्रश्नच आहे.(शहर प्रतिनिधी)