अखेर कारंजा व आष्टीवरील अन्याय दूर
By admin | Published: December 31, 2014 11:28 PM2014-12-31T23:28:44+5:302014-12-31T23:28:44+5:30
जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील ३६ गावांसह आष्टी व कारंजा तालुक्यातील २९२ गावांना दुष्काळी स्थितीतून वगळण्यात आले होते, याबाबत ‘लोकमत’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर
लोकमतची दखल : अंतिम पैसेवारीत होणार वास्तव नोंद
वर्धा : जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील ३६ गावांसह आष्टी व कारंजा तालुक्यातील २९२ गावांना दुष्काळी स्थितीतून वगळण्यात आले होते, याबाबत ‘लोकमत’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर या गावांची पैसेवारी ५० पेक्षा आत असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली आहे. अंतिम पैसेवारी जाहीर करताना ही गावे दुष्काळी स्थितीत मोडणार असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातील १३८७ गावे खरीप हंगाम पिकाखाली आहे. पैकी प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणाने तसेच लागवडयोग्य नसल्यामुळे पेरणी केली न जाणारी ४६ गावे वगळता खरीप पिकास पात्र १३४१ पैकी १०४९ गावांचीच खरीप पिकांची सुधारीत हंगामी पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा आत असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला होता. तर उर्वरित २९२ गावांची पैसेवारी मात्र ५० पैशापेक्षा अधिक असल्याचे दर्शविण्यात आले होते. यामध्ये आष्टी व कारंजा तालुक्यासह आर्वी तालुक्यातील ३६ गावांचा समावेश आहे. परिणामी या गावातील शेतकऱ्यांची या दुष्काळी स्थितीशी झुंज सुरू असतानाही त्यांच्यावर शासकीय मदतीपासून वंचित राहण्याचे सुल्तानी संकट निर्माण झाले होते. हे विदारक वास्तव ‘लोकमत’ने जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून देताच एकच खळबळ उडाली. यानंतर यंत्रणा कामाला लागली. अखेर सदर गावांतील वस्तुस्थिती लक्षात घेऊन या गावांची पैसेवारी ५० पेक्षा आत असल्याची बाब पुढे आली. यानुसार अंतिम पैसेवारी जाहीर करताना या गावांवर अन्याय होणार नाही. याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी एका बैठकीतून यंत्रणेला दिल्याची माहिती आहे.(जिल्हा प्रतिनिधी)