अखेर देवळीच्या वाळूचोर नगरसेवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 05:00 AM2021-12-26T05:00:00+5:302021-12-26T05:00:02+5:30

ट्रॅक्टर मालक माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर यांच्यावर कारवाई करून अटक करावी, तसेच मृताच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी, या मागणीकरिता लहू शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मृताच्या परिवाराने पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले, अखेर पोलिसांनीही याप्रकरणी वाळूचोर नगरसेवक गौतम पोपटकर याला अटक केली.

Finally, the sand thief corporator of Deoli was arrested | अखेर देवळीच्या वाळूचोर नगरसेवकाला अटक

अखेर देवळीच्या वाळूचोर नगरसेवकाला अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : वाळू चोरीकरिता जाणारा ट्रॅक्टर उलटून दोन मजुरांना जीव गमवावा लागला, तर पाच मजूर गंभीर जखमी झाले. याप्रकरणी ट्रॅक्टर मालक माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर यांच्यावर कारवाई करून अटक करावी, तसेच मृताच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी, या मागणीकरिता लहू शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मृताच्या परिवाराने पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले, अखेर पोलिसांनीही याप्रकरणी वाळूचोर नगरसेवक गौतम पोपटकर याला अटक केली.
येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर याने गेल्या दीड वर्षापासून सोनेगाव (बाई) शिवारातील नदी-नाल्यातून अवैधरीत्या वाळूचोरी सुुरू केली होती. याच दरम्यान सोमवारी सकाळी अडेगाव येथे वाळू आणण्याकरिता जाणाऱ्या एम.एच. ३२ ए.एच. ८७०९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला अपघात झाला. यामध्ये अनिल सुरेश लाकडे (३३) व ऋतिक दिनेश वानखेडे (२४) हे दोन मजूर ठार झाले, तर पाच मजूर गंभीररीत्या जखमी झाले. याप्रकरणी देवळी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक शंकर भानारकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 
ट्रॅक्टर मालक गौतम पोपटकर याचा वाळूचोरीचा व्यवसाय असून घटनेच्या दिवशी त्याच्या सांगण्यावरूनच आमच्या घरातील व्यक्ती ट्रॅक्टरवर कामाला गेली होती, असे मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. यासोबतच ट्रॅक्टरचा विमा नसल्याने आणि अपघातग्रस्त ट्रॉलीचे कागदपत्र संशयित असल्याने याप्रकरणी ट्रॅक्टर मालकावर कारवाई करण्याची मागणी पहिल्या दिवशीपासूनच सुरू होती; परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मृतांच्या परिवारासह लहू शक्ती संघटनेच्या पदाधिकारी शनिवारी देवळी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांच्या कारवाई विरुद्ध संताप व्यक्त करून पोपटकर यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. अखेर नागरिकांचा रोष बघून पोलिसांनी नगरसेवक पोपटकर यांना अटक केली. मालक व चालक यांच्याविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३०४-अ तसेच सहकलम १८४, १४६/१९६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्या. वाहनाचा विमा तसेच कागदपत्राची शहानिशा करून या गुन्ह्यात वाढ होण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

-    देवळी येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर याच्या सांगण्यावरून घटनेच्या दिवशी सकाळी दोन्ही मृत व्यक्ती वाळू आणण्यासाठी झोपेतून उठून गेल्याचे कुटुंबियांनी खासदारांच्या भेटी दरम्यान सांगितले आहे. या सोबतच पोपटकर याचा अवैधरित्या वाळू चोरीचा व्यवसाय चांगलाच फोफावला. त्यामुळे या घटनेत दोघांच्या मरणास तोही तितकाच जबाबदार असल्याने पोपटकर याच्या विरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
 

 

Web Title: Finally, the sand thief corporator of Deoli was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.