अखेर ‘त्या’ आरोपींची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 09:18 PM2018-12-25T21:18:56+5:302018-12-25T21:19:13+5:30
स्थानिक पोलिसांच्या दारूबंदी पथकाने सुरू असलेल्या दारूभट्टीवर छापा घालून दोन जणांना रंगेहात पकडले. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. परंतु दारूभट्टीकरिता वापरण्यात आलेले लाकूड हे आडजातसह सागवान असल्याने वनविभाग काय कारवाई करतो, करते याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : स्थानिक पोलिसांच्या दारूबंदी पथकाने सुरू असलेल्या दारूभट्टीवर छापा घालून दोन जणांना रंगेहात पकडले. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. परंतु दारूभट्टीकरिता वापरण्यात आलेले लाकूड हे आडजातसह सागवान असल्याने वनविभाग काय कारवाई करतो, करते याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले आहे.
सविस्तर असे की, रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास सुरगाव मौजा येथे धामनदीलगत वनविभागाच्या भूखंडावर राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलल्या विशाल मधुकर रंगारीसह राजेश पांडुरंग मेहता यांची मोहाफुलापासून गावठी दारूभट्टीचा व्यवसाय सुरू होता. या दारूभट्टीवर सेलू पोलिसांच्या दारूबंदी पथकाने छापा घालून आरोपींना ताब्यात घेतले.
ही दारूभट्टी वनविभागाच्या अखत्यारित असल्याने व दारूभट्टीकरिता सागवान लाकडांचा बेकायदेशीरपणे वापर झाल्याने वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. वनविभाग दारूभट्टी व्यावसायिकांवर काय कारवाई करतो, याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले आहे.
वनविभाग मौन का?
शासनस्तरावरून कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षलागवड करण्यात येत आहे. असे असताना दारूभट्टीकरिता साग जातीच्या लाकडांचा सर्रास वापर होत आहे. यावर वनविभागाचे अधिकारी तथा कर्मचारी मौन बाळगून का, याविषयी दारूबंदी महिला मंडळाकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.