अखेर विकास चौकाने घेतला मोकळा श्वास
By admin | Published: July 28, 2016 12:28 AM2016-07-28T00:28:32+5:302016-07-28T00:28:32+5:30
येथून बोरधरणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विकास चौकात अनेक पानटपरी चालकांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले होते.
पोलीस बंदोबस्तात बांधकाम विभागाची कारवाई
सेलू : येथून बोरधरणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विकास चौकात अनेक पानटपरी चालकांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले होते. या चौकातून वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. अखेर बांधकाम विभागाने पुढाकार घेत बुधवारी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविले. यामुळे विकास चौकाने मोकळा श्वास घेतला.
येथील विकास चौकात तहसील कार्यालय, पाटबंधारे विभाग, पंचायत समिती, वीज वितरण कार्यालय, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय रुग्णालय तसेच रजीस्टार कार्यालय आदी महत्त्वाची कार्यालये आहे. या चौकात मोठी वर्दळ असते. या संधीचा फायदा घेत पानटपरी चालकांनी तहसील कार्यालय व पाटबंधारे विभागाच्या संरक्षण भिंतीला लागून दुकानदारी थाटली होती. यामुळे वाहन धारकांना वाट काढणे कठीण झाले होते. याच चौकातून श्रीक्षेत्र घोराड, बोरधरण येथील अभयारण्यात जाण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी असते; पण लघु व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने बस, आॅटो डांबरी रस्त्यावर उभे राहत होते. यामुळे रहदारी धोक्याची ठरत होती. या अतिक्रमणाकडे काही संघटनांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर बांधकाम विभागाने सुमारे दोन महिन्यांपूर्वी संबंधितांना नोटीस बजावली होती; पण याकडे कुणीही लक्ष दिले नाही. तीन दिवसांपूर्वी पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले. यानंतर बुधवारी अतिक्रमण काढण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली. यावरून सकाळपासूनच काही व्यावसायिकांनी पानटपऱ्या हटविल्या. काही दुकाने जेसीबीच्या साह्याने उचलून नेण्याची कारवाई बांधकाम विभागाने केली.
ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता राजेश कुबडे, एस.वाय. भगत, कर्मचारी गावंडे, झामरे, कोडापे, ठाणेदार विलास काळे, पांडे, वानखेडे यांनी केली. दंगल नियंत्रण पथकाने त्यांना सहकार्य केले. शहरात प्रथमच पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.(तालुका/शहर प्रतिनिधी)