देशातील विश्वकर्मांना अर्थबळ; विविध राज्यांतील अठरा लाभार्थ्यांना धनादेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 07:07 AM2024-09-21T07:07:53+5:302024-09-21T07:08:08+5:30

आज देशभरातील विश्वकर्मांचा हा सन्मान केला   जात असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Finances for world works in the country Checks to eighteen beneficiaries in various states | देशातील विश्वकर्मांना अर्थबळ; विविध राज्यांतील अठरा लाभार्थ्यांना धनादेश

देशातील विश्वकर्मांना अर्थबळ; विविध राज्यांतील अठरा लाभार्थ्यांना धनादेश

वर्धा : बारा बलुतेदार हे भारताच्या समृद्धीचा मजबूत पाया होते. मात्र, त्यांची काँग्रेस राजवटीत थट्टा करण्यात आली. त्यामुळे विश्वकर्मा समाज उपेक्षित राहिला. आता मात्र आम्ही दखल घेतली असून त्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आहे. कारागिराने केवळ एवढ्यावरच थांबू नये तर तो उद्योजक व्हावा, तरच धातूविज्ञान, वस्त्रनिर्माण जगात सर्वोत्तम ठरेल. म्हणूनच आज देशभरातील विश्वकर्मांचा हा सन्मान केला   जात असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

 पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेतील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी  सुरू केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा स्वावलंबी शाळेच्या मैदानावर शुक्रवारी पार पडला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात देशभरातील १८ विश्वकर्मांना कर्जमंजुरीचे धनादेश वितरित करण्यात आले. यामध्ये उत्तरखंडमधील जैबून निशा या पहिल्या लाभार्थी ठरल्या. देशातील १ लाख लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने ओळखपत्र व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच १ लाख विश्वकर्मांना डिजिटल प्रमाणपत्रही ऑनलाइनरीत्या वितरित करण्यात आले.

७५ हजार लाभार्थ्यांना १४०० कोटींचे कर्ज

देशातील ७५ हजार लाभार्थ्यांना १४०० कोटींचे विनागॅरंटी कर्ज मंजूर करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातून कीर्ती संतोषराव रावेकर (टेलर्स, वर्धा) यांच्यासह जैंबुन निशा (गारलँड मेकर, उत्तराखंड), सिंटू कुमार (बिहार, डॉल व टॉय मेकर), अखिरिली किरहा (सुतार, नागालँड), रामनाथसिंग गुजर (मूर्तिकार, मध्य प्रदेश), सतीश के. सी. (सोनार, केरळ), सुदिप्ता दास (मत्सजाळे कारागीर, ओडिशा) यांच्यासह विविध राज्यांतील १८ जणांना कर्जमंजुरीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. 

‘साडेसहा लाख कुटुंबांचे चित्र पालटणार’

एकाच कार्यक्रमातून साडेसहा लाख कुटुंबांना रोजगारांची संधी उपलब्ध होणार असून त्यांचे चित्र पालटणार आहे. अमरावतीच्या पीएम मित्र टेक्सटाईल पार्कमुळे भारताचे नाव विश्वाच्या नकाशावर येणार. देशातील ७ टेक्सटाईल पार्कमध्ये अमरावतीचा समावेश असल्याने ही महाराष्ट्राकरिता मोठी उपलब्धी आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

..अन् राणा झाल्या भावुक

पंतप्रधानांच्या हस्ते अमरावतीमधील टेक्सटाइल पार्कची ऑनलाइन पायाभरणी करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या पार्कसाठी माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करून त्यांचे कौतुक केले. यावेळी भावुक झालेल्या राणा यांचे डोळे पाणावले.

Web Title: Finances for world works in the country Checks to eighteen beneficiaries in various states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.