तीन विभाग नियंत्रकांचे आर्थिक, प्रशासकीय अधिकार गोठविले
By रवींद्र चांदेकर | Published: August 3, 2024 06:33 PM2024-08-03T18:33:21+5:302024-08-03T18:35:30+5:30
Vardha : त्यांच्याविरुद्ध अनेक कर्मचारी व संघटनांची तक्रार
वर्धा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी राज्यातील तीन विभाग नियंत्रकांचे आर्थिक व प्रशासकीय अधिकार गोठवले आहेत. तसे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
बुलढाण्याचे विभाग नियंत्रक अशोककुमार महादेवराव वाडिभस्मे, ठाणे (हं)चे विभाग नियंत्रक विलास विठ्ठल राठोड आणि सोलापूर येथील विभाग नियंत्रक (ता) विनोदकुमार साहेबराव भालेराव, अशी अधिकार गोठविलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध अनेक कर्मचारी व संघटनांची तक्रार होती. त्याची दखल घेत अखेरीस या तीनही विभाग नियंत्रकांचे आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार गोठवून ते इतर समकक्ष अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्याचे आदेश उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी निर्गमित केले आहे.
अशोककुमार वाडीभस्मे यांचे अधिकार सर्व आर्थिक व प्रशासकीय अधिकार गोठवून ते अकोला (हं)च्या विभाग नियंत्रक शुभांगी यशवंत शिरसाठ यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यांच्याकडे अकोला येथील स्वतःच्या पदाचे कामकाज सांभाळून बुलढाणा येथील पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे. ठाण्याचे विलास राठोड यांचे अधिकार गोठवून ते पालघरचे विभाग नियंत्रक राजेंद्र दामोदर जगताप, तर सोलापूरचे विनोदकुमार भालेराव यांचे अधिकार गोठवून ते सांगलीचे विभाग नियंत्रक सुनील ज्ञानेश्वर भोकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. या सर्वांना दरमहा दीड हजार रुपये मर्यादेपर्यंत नियमाधीन अतिरिक्त वेतन मंजूर करण्यात आले आहे.
नवीन नेमणुकीपर्यंत अधिकार
तीनही अधिकाऱ्यांकडे हा अतिरिक्त कार्यभार नियमित किंवा अन्य अधिकाऱ्याची नेमणूक होईपर्यंत राहणार आहे. नियमित, अन्य अधिकाऱ्यांच्या नेमणुकीनंतर अतिरिक्त कार्यभार खंडित होणार असल्याचे आदेशातून नमूद करण्यात आले आहे.