रूरल मॉलमुळे बचत गटांना आर्थिक स्थैर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:00 AM2017-10-06T00:00:57+5:302017-10-06T00:01:11+5:30
महात्मा गांधींची ग्राम विकासाची संकल्पना साकार करण्यासाठी गृह व कुटीर उद्योगांना बळकटी मिळणे गरजेचे आहे. बचत गटाच्या माध्यमातून उभे राहिलेल्या गृह व कुटीर उद्योगांमार्फत उत्पादित वस्तूंना ....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधींची ग्राम विकासाची संकल्पना साकार करण्यासाठी गृह व कुटीर उद्योगांना बळकटी मिळणे गरजेचे आहे. बचत गटाच्या माध्यमातून उभे राहिलेल्या गृह व कुटीर उद्योगांमार्फत उत्पादित वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून वर्धा जिल्ह्यात ‘दी रूरल मॉल’ सुरू करण्यात आला आहे. यामुळे आता महिला व शेतकरी बचत गटांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई-उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन झाल्याचे घोषित केले. या मॉलचे प्रत्यक्ष फीत कापून उद्घाटन खा. रामदास तडस यांनी केले. यावेळी विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, न.प. अध्यक्ष अतुल तराळे, कृषी समृद्धी समन्वयित विकास प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक निलेश वावरे, माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी ललिता दारोकर उपस्थित होत्या.
दी रूरल मॉल हे बचत गटाच्या व्यवसायाला मिळालेली सुवर्ण संधी आहे. महिला व शेतकºयांनी याचा उपयोग करून घ्यावा. उत्पादित मालाची गुणवत्ता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन खा. तडस यांनी केले.
शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत यांनी उत्पादित व प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांना विक्रीचे ठिकाण उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाने दी रुरल मॉल सुरू केला. मुख्य रेल्वे स्टेशन समोरील पुरवठा विभागाच्या बंद गोदामाला मॉलचे रूप दिले आहे. या मॉलद्वारे ग्राहकांना चांगल्या प्रतीची उत्पादने वाजवी दरात मिळतील. शेतकºयांना विपनन प्रक्रियेशी जोडण्यास्तव राबविलेला महत्वाकांक्षी उपक्रम आहे. ग्राहकांनी या मॉलला भेट देत खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले.
यावेळी जि.प. सीईओ नयना गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कल्पना जुईकर उपस्थित होते. हा रथ जिल्ह्यातील सेवाग्राम, कान्हापूर, पडेगाव, इसापूर व भिडी या ग्रा.पं.मध्ये कला पथकाच्या माध्यमातून ग्राम विकासाच्या योजनांचा प्रचार करेल. रथाचा पूढील प्रवास यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, हिंगोली जिल्ह्यांत होणार आहे. यावेळी देवकुमार कांबळे, मनीष कावडे, गजानन ताजने, अमोल पाटील, अमोल भागवत, रोटोले आदी उपस्थित होते.
ग्राम विकासासाठी लोकांचा सहभाग व भागीदारी वाढविण्याकरिता मिशन अंत्योदय अंतर्गत १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान ग्राम समृद्धी व स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात येत आहे. राज्यात ग्रामविकासाच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी कौशल्य रथ प्रत्येक जिल्ह्यात फिरविण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यात गुरूवारी आगमन झालेल्या या रथाला महात्मा गांधी चौक येथून खा. रामदास तडस यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.