बांगडी निर्र्मितीतून महिलांना आर्थिक बळ
By admin | Published: April 8, 2017 12:32 AM2017-04-08T00:32:27+5:302017-04-08T00:32:27+5:30
ग्रामीण भागातील महिलांची चिकाटी व ध्येय याची सांगड घालत एका स्वयंमसेवी संस्थेने बांगडी निर्मितीतून महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला.
रोजगाराच्या नव्या वाटा : स्वयंसेवी संस्थाच्या पुढाकारातून महिलांना प्रशिक्षण
अरविंद काकडे आकोली
ग्रामीण भागातील महिलांची चिकाटी व ध्येय याची सांगड घालत एका स्वयंमसेवी संस्थेने बांगडी निर्मितीतून महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला. या नाविण्यपूर्ण उपक्रमातील महिलांचे यश पाहुन गावातील अन्य महिलांनी प्रेरणा घेत त्या बांगडी निर्मिती व्यवसायाकडे वळत आहे.
ग्रामीण भागात शेतमजुरीशिवाय रोजगाराचा अन्य पर्याय नाही. पण खडकी (आमगाव) येथील महिलांनी रोजगाराची नवी वाट चोखंदळत आर्थिक सबलीकरणाकडे वाटचाल सुरू केली आहे. जंगलव्याप्त भागात लाख उपलब्ध होते. यापासून बांगडी निर्मिती करण्याची कल्पना महिलांना वनपरिक्षेत्र अधिकारी पि.एम. वाडे यांनी दिली. महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करावा म्हणून त्यांना प्रेरित केले. स्वयंसेवी संस्थेने यात पुढाकार घेत गावातील दहा महिलांची प्रशिक्षणासाठी निवड केली. गिरड येथे प्रशिक्षण घेतल्यावर दोन महिलांचा एक गट तयार केला. घरबसल्या महिलांना बांगडी निर्मित करण्याचे उद्दीष्ट दिले. महिलांनी सुरू केलेल्या नाविण्यपूर्ण व्यवसायाकडे ग्रामस्थ कुतुहलाने पाहत. महिलांनी न डगमगता आपले कार्य सुरू ठेवले. क्षेत्र सहाय्यक नरेश वाघमारे यांनी वेळोवेळी महिलांना मार्गदर्शन केले. तर कच्चा माल स्वयंसेवी संस्थेने उपलब्ध करुन दिला. गटातील एक महिला दिवसाला ४०-६० बांगड्या तयार करते. ५ रुपये दराने स्वयंसेवी संस्था बांगड्यांची खरेदी करते. त्यामुळे महिलांना २५० ते ३०० रुपये रोज घरबसल्या मिळतो. उन्हाळ्यात कष्टाची शेतीकाम करण्यापेक्षा बांगडीनिर्मिती व्यवसायात महिलांना चांगली मिळकत होत आहे. बांगडी निर्मितीतील महत्त्वाचा घटक लाख असून स्थानिक पातळीवर लाख उपलब्ध व्हावी म्हणून वनविभाग प्रयत्न करीत आहे. जंगलव्याप्त भागातील गावात रोजगार निर्मितीचे वनविभागाचे ध्येय असून या माध्यमातून महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले.
दिवसाला लाखेपासून ५० बांगड्या तयार करतो. यातून २५० ते ३०० रुपये मिळतात. बांगड्यांची विक्री करण्यासाठी आम्हाला बाजारपेठ शोधावी लागत नाही. संस्थाच त्या खरेदी करीत असल्याने घरबसल्या रोजगार मिळाला.
- लक्ष्मी पंधराम,
महिला खडकी