बाजारातील ओट्यांचे काम पूर्ण; पण लिलाव अडले
By admin | Published: January 26, 2017 02:07 AM2017-01-26T02:07:43+5:302017-01-26T02:07:43+5:30
येथे बाजाराकरिता ११ ओटे बनविण्यात आले. याला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला. अद्याप या
दुर्लक्ष : नागरिकांकडून ओट्यांचा वापर वैयक्तिक कामासाठी
सेवाग्राम : येथे बाजाराकरिता ११ ओटे बनविण्यात आले. याला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला. अद्याप या ओट्यांचा लिलाव करण्यात आला नाही. याला ग्रामपंचायतीचे उदासीन धोरण कारणीभूत ठरत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
येथील जुन्या वस्तीतील नांदोरा मार्गावर जिल्हा वार्षिक जनसुविधा योजना अंतर्गत बाजार ओटे आणि नालीचे बांधकाम करण्यात आले. याचे भूमिपूजन २०१४ मध्ये करण्यात आले. तसा फलक येथे लावण्यात आला. प्रत्यक्षात वर्षभरापूर्वी निर्माण कार्य सुरू झाल्याची माहिती आहे. ओट्याचे निर्माण कार्य पूर्ण झाल्यावर ते वापरात येणे गरजेचे होते. मात्र लिलाव झाले नसल्याने ओटे तसेच रिकामे पडून आहे.
येथे ओटे बांधकाम सुरू असताना परिसरातील नागरिकांनी याला विरोध दर्शविला होता. जुन्या वस्तीऐवजी आश्रम मार्गावर ओटे बांधण्यात यावे, अशी मागणी केली होती. संबंधितांनी नागरिकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. नागरिकांच्या घरासमोर ओटे बांधण्यात आले. अद्याप ते वापरात आलेले नाही. भविष्यात या ओट्यांचा त्रास परिसरातील रहिवाशांना होईल, असे दिसून येते. त्यामुळे याला विरोध दर्शविण्यात आला. या मार्गावर पेव्हर ब्लॉक लावून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाला कधी सुरूवात यआकडे म्रहिवाशांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)
घरातील वाळवणही बाजार ओट्यावर
४जुन्या वस्तीतील मुख्य आणि नांदोरा मार्गावर बाजार ओटे बांधण्यात आले. हे ओटे गावाच्या दर्शनी भागात आहेत. त्याचा लिलाव करण्यात आला नाही. ज्या नागरिकांच्या घरासमोर हे ओटे आहे ते याचा वापर घरातील वाळवण व इंधन ठेवण्याकरिता करीत असल्याचे दिसते.