वर्ध्यात माजी कुलपतीसह दोघांविरुद्ध एफआयआर; चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:01 AM2018-07-24T11:01:51+5:302018-07-24T11:03:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे माजी कुलपती विभूतिनारायण राय, यांच्यासहित दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल एफआयआरनुसार तपास करण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश अपूर्वा भसारकर यांनी दिला.
ही बाब सहा वर्षापूर्वीची आहे. तत्कालीन शोधछात्र राजीवकुमार सुमन याने बनावट मायग्रेशन दाखल केल्याची तक्रार माजी कुलपती विभूतिनारायण राय, डेप्युटी रजिस्टार कादरनवाज खान, प्रभारी कौशल किशोर त्रिपाठी यांनी पोलिसांत दाखल केली होती. पोलिसांनी या तक्रारीची दखल न घेतल्याने वर्धा न्यायालयाने या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला होता. पण यात काही तथ्य न मिळाल्याने पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. २०१२ मध्ये बनावट मायग्रेशन दाखल करण्याबाबत पोलिसात तीन तक्रारी दाखल झाल्या होत्या. दरम्यान राजीवकुमार सुमन यांना बडतर्फ केले गेले होते. याच दरम्यान राजीवकुमार सुमन यांनी कुलपतींच्या विरोधात क्लोजर रिपोर्टचा विरोध करीत अर्ज दिला होता. त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायाधीश अपूर्वा भसारकर यांनी १३ जुलै रोजी आदेश पारित करून फारशी दखल न घेता तपास केल्याचा तसेच ज्या महाविद्यालयाचे बनावट प्रमाणपत्र त्याच महाविद्यालयात कोणी कसे दाखल करेल, अशी टिप्पणी केली आहे. न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा तपासणी करून तीन महिन्यांत चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.