वर्ध्यातील आदित्य रेसिडेन्सिमध्ये आग; फ्लॅटमधील साहित्याची राखरांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 05:41 PM2022-04-14T17:41:21+5:302022-04-14T18:33:40+5:30
यामध्ये फ्लॅटमधील साहित्य जळाल्याने अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविली जात आहे.
वर्धा : शहरालगतच्या सावंगी (मेघे) परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या आदित्य रेसिडेन्सीमधील एका बंद फ्लॅटमध्ये आग लागल्याने चांगलीच खळबळ उडाली. गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून लागलीच वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले. यामध्ये फ्लॅटमधील साहित्य जळाल्याने अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविली जात आहे.
सांवगी येथील आदित्य रेसिडेन्सीमधील पहिल्या माळ्यावरील १०५ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मगेश ढवळे हे किरायाणे राहतात. ते पुलगाव येथील मुळ रहिवासी असून भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी सकाळी ते परिवारासह पुलगाव या मुळगावी गेले होते. त्यामुळे फ्लॅट बंद असताना दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटमधून धुराचे लोळ बाहेर येतांना दिसले. त्यामुळे नागरिकांनी तातडीने सावंगी पोलीस आणि वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला याची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. फ्लॅट बंद असल्याने मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला तर धुराचे लोळ अंगावर येत होते. तसेच सर्व फ्लॅटचा विद्युत पुरवठा बंद केल्याने कर्मचाºयांना आग विझविताना तारेवरची कसरत करावी लागली. सातत्याने पाण्याचा मारा करुन आगीवर बºयाच काळानंतर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीमध्ये बेडरुमधील साहित्य, पुस्तक यासह इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू जळाल्याने जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या आगीमुळे आतून पूर्ण फ्लॅट काळवंडला असून ढवळे परिवार सकाळी देवालयात दिवा लावून घराबाहेर पडले. त्यामुळेच आगीचा भडका उडाला असावा, असा अंदाज घटनास्थळी उपस्थितांनी व्यक्त केला.
अन् मोठा अनर्थ टळला
आदित्य रेसिडेन्सीमध्ये आग लागताच धावाधाव सुरु झाली. इतरही फ्लॅटमधील परिवारांनी बाहेर पडून तळमजला गाठला. पोलीस कर्मचाऱ्यांसह अग्निशन दलाचे वाहनचालक चेतन खंडारे, फायरमन गौरव शेगावकर, प्रशील देशमुख व संतोष मरकवाडे आदींनी आग लागलेल्या फ्लॅटमध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कसोसिने प्रयत्न चालविले. मोठ्या परिश्रमाने फ्लॅटमध्ये प्रवेश करुन सर्वप्रथम स्वयंपाकगृहातील दोन सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.