दोन वर्षांपासून रेंगाळलेय जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिट, तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 03:29 PM2021-01-09T15:29:26+5:302021-01-09T15:30:08+5:30
wardha : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडिट करून घेण्यासाठी न.प.च्या अग्निशमन विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला.
वर्धा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एखाद्यावेळी आगीसारखी अनुचित घटना घडल्यावर परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविता यावे या हेतूने फायर ऑडीट होणे गरजेचे आहे. त्यासाठी वर्धा न.प.च्या अग्निशमन विभागाकडे पत्रव्यव्हार करण्यात आले. त्यांनी त्यांचा लेखी अभिप्रायही जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला सादर केला आहे. पण त्यानंतर कुठलीही कार्यवाही न झाल्याने मागील दोन वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिट रेंगळले असल्याचे वास्तव आहे. पण शनिवारी भंडारा येथील घटनेनंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी सदर रेंगाळलेला विषय तातडीने निकाली काढण्यासाठी संबंधितांशी वेळीच पत्रव्यवहार करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
२०१८ मध्ये दिला न.प.ने अभिप्राय
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडिट करून घेण्यासाठी न.प.च्या अग्निशमन विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला. याच पत्रव्यवहाराची दखल घेत न.प.च्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून सन २०१८ मध्ये आपला लेखी अभिप्राय जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिला. पण त्यानंतर पाहिजे तसे प्रयत्न न झाल्याने हा विषय मार्गी निघालेला नाही.
अग्निरोधक सिलिंडर बेपत्ता
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध विभागात खबरदारीचा उपाय म्हणून किमान अग्निरोधक सिलिंडर असणे क्रमप्राप्त आहे. पण आवश्यक ठिकाणी अग्निरोधक सिलिंडरच नसल्याचे बघावयास मिळते. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निरोधक सिलिंडर बेपत्ता तर झाले नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केवळ एकाच खासगी रुग्णालयात हॅडरन सिस्टीम
वर्धा शहरात शंभराहून अधिक खासगी रुग्णालय आहेत. पण केवळ एकाच खासगी रुग्णालयात आग लागल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावीपणे उपयुक्त ठरणारी हॅडरन सिस्टीम आहे. तर एका चित्रपटगृहातही सदर व्यवस्था आहे. विशेष म्हणजे सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयाचे फायर ऑडीट झाले असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाला २०१८ मध्ये आम्ही फायर ऑडीट संदर्भातील लेखी अभिप्राय सादर केला आहे. पण त्यानंतर त्यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडीट झालेले नाही. भंडारा येथील घटनेची दखल घेत न.प.चा अग्निशमन विभाग हा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला फायर ऑडीट का केले जात नाही याबाबत विचारणा करणार आहे. त्यासाठी सोमवारनंतर लेखी पत्र देण्यात येणार आहे.
- रविंद्र जगताप, विभाग प्रमुख, अग्निशमन विभाग, न.प. वर्धा.
भंडारा येथील घटनेनंतर वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडीट झाले काय याची मी स्वत: शहानिशा केली. फायर ऑडीट झाले नसले तरी रुग्णालयात आवश्यक ठिकाणी अग्निरोधक सिलिंडर आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडीट करण्यासाठी संबंधित विभागाशी तातडीने लेखी पत्रव्यवहार करण्यात यावे अशा सूचना आपण आज संबंधितांना दिल्या आहेत. लवकरच हा विषय मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे.
- डॉ. सचिन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.