आर्वी तालुक्यातील जळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला आग, २ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 01:47 PM2022-01-07T13:47:45+5:302022-01-07T14:01:41+5:30
जळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आज सकाळी सौर ऊर्जा पॅनलच्या बॅटरीमध्ये तांत्रिक बिघाड होऊन वायरिंगने पेट घेतला.
वर्धा : आर्वी तालुक्यातील जळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी (७) सकाळी नऊच्या दरम्यान आग(Fire) लागली. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली, सुदैवाने जीवितहानी टळली. यात जवळपास २ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
जळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सौर ऊर्जेचे पॅनल आहे. याच्या बॅटरीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वायरिंगने पेट घेतला. याबाबत कळताच डॉक्टर मिलिंद वर्मा यांनी लगेच आर्वी नगर पालिका अग्निशमन दल व पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. तर सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थांनी साहित्य बाहेर काढण्यास मदत केली.
या घटनेत सर्व खोलीतील वायरिंग जळाल्या तर एका रुममधील टीव्ही, इन्व्हर्टर, सेट अप बॉक्स बॅटरी जळून खाक झाले असून एकंदरीत २ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तर, महत्त्वाचे कोणतेही कागदपत्र दस्तऐवज जळाले नसल्याचे डॉक्टर पवन पाचोडे सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता झोपाटे यांनी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या घटनेने पुन्हा फायरिंग ऑडिटचे काय? असा पुन्हा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.