चोरट्यांनी लावली गोठ्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:31 PM2018-03-29T23:31:55+5:302018-03-29T23:31:55+5:30
नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वरील येथून आठ किमी अंतरावरील दारोडा येथील शेतकरी मारोतराव लाजुरकर यांच्या शेतीसाहित्याची चोरी केली.
ऑनलाईन लोकमत
हिंगणघाट/दारोडा : नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वरील येथून आठ किमी अंतरावरील दारोडा येथील शेतकरी मारोतराव लाजुरकर यांच्या शेतीसाहित्याची चोरी केली. यानंतर गोठ्याला आग लावून पळ काढला. ही घटना बुधवारी रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास घडली. चोरीसह आगीत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले.
दारोडा येथील शेतकरी मारोतराव लाजुरकर यांची राष्ट्रीय महामार्गालगत १५ एकर शेती आहे. त्यात ३० बाय ४० फुट गोठ्याचे बांधकाम केले होते. यात संपूर्ण शेतीसाहित्य ठेवले होते. बुधवारी रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील शेतीसाहित्य लंपास केले. शिवाय गोठ्याला आग लावली. चोरट्यांनी गोठ्यातील १६ मिमीचे ८० बंडल ड्रीप पाईप किंमत ५ लाख, स्प्रिंकलरचे १५० पाईप किंमत दीड लाख रुपये, गोठ्यातील नांगर, वखर, फवारणी यंत्र आदी शेतीसाहित्य चोरट्यांनी वाहनात भरून पलायन केले. तत्पूर्वी, त्यांनी गोठ्याला आग लावली. यात ३० बाय ४० फुटाचा अँगल व टिनाचा गोठा जळून खाक झाला. शिवाय १५ ट्रॅक्टर कुटार जळून खाक झाले. आगीमुळे गोठ्यातील तीन गाई गंभीर जखमी झाल्या असून मृत्यूशी झुंज देत आहे. घटनेची माहिती मिळताच लाजुरकर यांनी शेत गाठले. रात्री १२ वाजताच्या सुमारास हिंगणघाट न.प. च्या अग्निशामन विभागात दूरध्वनी केला असता ‘नो रिप्लाय’ येत होता. अखेर त्यांच्या नातलगाने स्वत: जाऊन माहिती दिल्यानंतर अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले; पण तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. चोरी गेलेल्या साहित्यासह आगीत १० लाखांचे नुकसान झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.