आगीत घर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:15 AM2018-03-14T00:15:14+5:302018-03-14T00:15:14+5:30
येथील वॉर्ड क्रमांक पाच मधील दीपक वाघमारे यांचे घर सोमवारी रात्री जळून खाक झाले. यात त्यांच्या घरातील सर्वच जीवनावश्यक वस्तुंचा कोळसा झाला आहे.
ऑनलाईन लोकमत
समुुद्रपूर : येथील वॉर्ड क्रमांक पाच मधील दीपक वाघमारे यांचे घर सोमवारी रात्री जळून खाक झाले. यात त्यांच्या घरातील सर्वच जीवनावश्यक वस्तुंचा कोळसा झाला आहे. यावेळी कुटुंबियांनी वेळीच सतर्कता बाळगल्याने जीवितहानी झाली नाही.
या आगीत वाघमारे यांच्या घरातील सर्वच साहित्याचा कोळसा झाला. यात सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर घर मालकाला शासनाच्यावतीने मदत देण्याची मागणी गावकºयांकडून करण्यात येत आहे.
येथील वॉर्ड क्रमांक पाच मध्ये दीपक वाघमारे व विकास वाघमारे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. घरालगतच एका झोपडीत त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी दीपक स्वयंपाककरित असताना गॅसवर भात मांडून बाहेर पाणी आणण्यासाठी गेला. तेवढयात अचानक घरामध्ये आगीने भडका घेतल्याचे त्याला दिसले. घरामध्ये गॅस सिलिंडर असल्यामुळे कोणीच घरात प्रवेश केला नाही. आगीत घरातील गॅस सिलिंडर, शेती उपयोगी साहित्य, लोखंड कापण्याचे यंत्र, गादी, कपडे, धान्य, स्वयंपाकाचे भांडे, टिनपत्रे यासह १५ हजार रुपये रोख रक्कम, ताडपत्री आदी साहित्याचा कोळसा झाला.
आग विझविण्यासाठी घरी पाणी उपलब्ध नसल्यामुळे सुभाष कातुलवार यांच्या विहिरीवरील मोटरपंप सुरू करून आग विझविण्यात आली. घरात कोणीच हजर नसल्यामुळे जीवितहानी टळली. दिपक व विकास दोघेही भाऊ मोल मजूरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. आगीत सर्वच भस्मसात झाल्यामुळे अंगावरील कपड्याशिवाय त्यांचे जवळ काहीच शिल्लक नाही. तलाठी ढोक यांनी पंचनामा करून तहसील कार्यालयात तातडीने अहवाल सादर केला. उपनगराध्यक्ष रविंद्र झाडे, नगरसेवक आशिष अंड्रस्कर यांनी वाघमारे कुटूंबियांना भेट देवून सांत्वना केली व मदतीचे आश्वासन दिले.
नारायणपूर येथेही आगीत घर खाक
नारायणपूर - येथील सुभाष पुसदेकर यांच्या घराला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. यात घरातील कापूस, चणा, गहू आदी पिकासह सर्वच साहित्याची राख झाली. सदर घटनेचा पंचनामा नारायणपूर येथील तलाठी प्रमोद रंगारी यांनी केला असून शासनाने अजून कोणत्याही प्रकारची मदत केली नाही.