आगीची ४०० झाडांना झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 11:45 PM2019-03-03T23:45:51+5:302019-03-03T23:47:31+5:30
हनुमान टेकडीवरील आॅक्सिजन पार्क परिसरात लागलेल्या आगीत जवळपास ४०० झाडांना झळ पोहोचली. रविवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्यांसह नागरिकांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हनुमान टेकडीवरील आॅक्सिजन पार्क परिसरात लागलेल्या आगीत जवळपास ४०० झाडांना झळ पोहोचली. रविवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्यांसह नागरिकांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. सतर्कतेमुळे कोणत्याही झाडांची हानी झाली नाही.
ओसाड पडलेल्या हनुमान टेकडीवर वैद्यकीय जनजागृती मंचाच्या पुढाकाराने सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येत हिरवळ फुलविली. नुकताच ‘मियावाकी डेन्स फॉरेस्ट’ प्रकल्पही राबविण्यात आला आहे. सध्या या परिसरात १ हजार ५०० च्या वर वृक्षांची लागवड करून संवर्धन केले जात आहे. यासाठी रोज सकाळी आणि सायंकाळी वैद्यकीय जनजागृती मंचासह वर्धेकरही येथे श्रमदान करतात. हा परिसर आता ‘आॅक्सिजन पार्क’ म्हणून नावारूपास आला आहे. आज या परिसरालगतच्या हिंदी विश्वविद्यालयाकडील सुरक्षा भिंंतीकडून आग लागली होती. ही आग आॅक्सिजन पार्कपर्यंत येऊन पोहोचली. नेहमीप्रमाणे सकाळी टेकडीवर गेलेले अनंत बोबडे यांना ही आग दिसून आली. त्यांनी लगेच वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. लगेच सर्वांनी टेकडी गाठत पाण्याचा मारा करून आग विझविली. विशेषत: सर्व वृक्षांना पूर्वीपासूनच आळे केले असल्यामुळे आग वृक्षांपर्यंत पोहोचू शकली नाही. मात्र, ४०० झाडांना झळ पोहोचली आहे. या झाडातील आळ्यात पाणी साठविण्यात आले आहे. ही आग सिगारेटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. या परिसरात रात्रीच्या सुमारास मद्यपींचा वावर असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. यापूर्वीही दोनवेळा आगीच्या घटना घडल्या आहे. वेळीच लक्ष दिले नाही, तर अनेक वर्षांच्या तसेच अनेकांच्या परिश्रमावर पाणी फेरले जाईल.