आगीत संसारोपयोगी साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:23 PM2018-12-14T22:23:52+5:302018-12-14T22:24:20+5:30
पूर्व हुडकोतील घटना : सुदैवाने जीवितहानी टळली, लाखोंचे नुकसान, सात घरांना बसला फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील चाळीसगाव रोडवरील पूर्व हुडको भागातील एका घरात गॅससिलिंडरच्या लिकेजमुळे शॉर्टसर्किट होऊन घरांना आग लागली़ यात सात घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र या घटनेत लाखोचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़
चाळीसगाव रोडवरील पूर्व हुडको भागातील ईस्माईल गॅरेजच्या बाजुला एका घरात स्वयंपाक सुरु होता़ त्यावेळी बारीक स्वरुपात गॅस लिकेज झाल्याने दुपारी १२ ते सव्वाबारा वाजेच्या सुमारास घरात शॉर्टसर्किट झाले़ यातून पडलेल्या ठिणगीमुळे गॅसने भडका घेतल्याने त्यात घर पेटले़ गांभीर्य ओळखून घरातील मंडळी तातडीने घराबाहेर पडली़ परिणामी त्यांचा जीव वाचला़ पाहता पाहता आगीने संपूर्ण घर जळून खाक झाले़ ज्या घरात ही घटना घडली त्याच्यासह दोन्ही बाजूची काही घरे यात भस्मसात झाली़ त्यात फरमान सैय्यद रज्जाक, अमिनाबी दादा सैय्यद, महेमूद सय्यद, यास्मीन खाटीक, सबीनाबी म़ शेख यांच्या घरांसह अन्य घरांचा समावेश आहे़
मदतकार्य वेगात
आगीच्या या घटनेमुळे परिसरात होत असलेला आरडाओरड ऐकून अनेक जणांनी घटनास्थळ गाठून मदतीसाठी धावले. या आगीमुळे गॅस सिलिंडर फुटले असते तर मोठा अनर्थ झाला असता़ मात्र, याच परिसरातील नवाज शेख गयासुद्दीन या तरुणाने इतरांच्या मदतीने पेटत्या घरातील गॅस सिलिंडर यशस्वीपणे बाहेर काढले़ आगीमुळे संपूर्ण सिलिंडर काळे झाले होते़ ते वेळीच बाहेर काढले नसते तर त्याचाही स्फोट होवून घटनेची तीव्रता अधिकच वाढली असती़ मात्र, सुदैवाने ते टळले.
अग्नीशमन बंब दाखल
आगीच्या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले़ मात्र, या ठिकाणी वाहन जाण्यासाठीही जागा नसल्याने बंबाला दूर थांबून आगीवर नियंत्रण मिळवावे लागले़
पोलीस पथक तातडीने दाखल
आगीच्या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलिसांचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते़
या घटनेची अग्नीउपद्रव म्हणून नोंद करण्यात आली असून अनेक संसार उघड्यावर आले दरम्यान आगीमुळे कुटूंब उघड्यावर आले आहे़