तणस भरलेल्या चालत्या वाहनाला आग
By Admin | Published: March 5, 2017 12:31 AM2017-03-05T00:31:58+5:302017-03-05T00:31:58+5:30
येथील वडगाव हिवरा मार्गाने हिवरा येथे तणस घेवून जात असलेल्या वाहनाला शॉटर्सकिटने आग लागली.
हिवरा मार्गावरील घटना : वाहनासह ४ लाख ६० हजारांचे नुकसान
समुद्रपूर/ गिरड: येथील वडगाव हिवरा मार्गाने हिवरा येथे तणस घेवून जात असलेल्या वाहनाला शॉटर्सकिटने आग लागली. या आगीत वाहनातील तणस आगीच्या भक्षस्थानी आले. पाहता पाहता संपूर्ण वाहन आगीच्या कवेत आले. यात वाहन मालकाचे ४ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शनिवारी दुपारी घडली.
प्राप्त माहिती नुसार, गंगाधर रामकृष्ण मसके रा. काचुर्ली त. पवनी, जि. भंडारा यांच्या मालकीचे एम एच ३६ एफ २३१० क्रमांकाचे वाहन आहे. वाहन चालक शिवदास तेजराम मरगडे (३२) रा. सोननाडा त. पवणी, जि. भंडारा हा तणस घेऊन हिवरा येथील निवासी शेतकरी भगवान भुरे यांच्या शेताकडे जात होता. दरम्यान वडगाव हिवरा मार्गावर वाहनाने अचानक पेट घेतला. यात पाहता पाहता पूर्ण तणस जळून राख झाली. सोबतच वाहनसुद्धा जळाले. यात ४ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहीती मिळताच परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र उन्हाच्या झळांमुळे या आगीवर ताबा मिळविणे शक्य झाले नाही.
घटनेची माहिती मिळताच गिरड ठाण्याचे निरीक्षक देवळे यांच्या मार्गदशनात रहीम शेख, नितीन नागोसे, गजानन घोडे, महैद्र गिरी, रामदास दराळे, नरेंद्र बेलखेडे यांनी घटनास्थळ गाइून पंचनामा केला. घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)
दोन दिवसातील दुसरी घटना
धावत्या वाहनात आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. शुक्रवारी पहाटेच्या केळझर येथे भरधाव ट्रकने पेट घेतला. यात संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. या घटनेला दिवस लोटत नाही तोच समुद्रपूर तालुक्यात दुसऱ्या वाहनाने पेट घेतला.