आगीमुळे शेकडो झाड भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 11:45 PM2018-04-12T23:45:12+5:302018-04-12T23:45:12+5:30
सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने रत्नापूर चौरस्ता ते अडेगावा ते गिरोली रस्त्याच्या दुतर्फा लावलेली शेकडो झाडे धुऱ्याला लावलेल्या आगीमुळे भस्मसात झाली आहेत. अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने रत्नापूर चौरस्ता ते अडेगावा ते गिरोली रस्त्याच्या दुतर्फा लावलेली शेकडो झाडे धुऱ्याला लावलेल्या आगीमुळे भस्मसात झाली आहेत. अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार शासनाच्या वृक्षसंवर्धनाच्या संकल्पनेला हरताळ फासणारा ठरत असल्याने याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींची आहे.
रत्नापूर ते गिरोली व परिसरातील इतर ग्रामीण रस्त्यावर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात चार वर्षांपूर्वी शेकडो रोपटे लावण्यात आली. अल्पवधीतच ही रोपटी मोठीही झाली. या कार्यात शासनासोबतच सामाजिक संस्थाचे योगदान घेण्यात आले. लांब उंच वाढलेल्या झाडांमुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूचा परिसर हरितमय झाला असताना धुऱ्यांना लावलेल्या आगीत शेकडो झाडे भस्मसात झाली.
परिसरातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळवाही व पावसाळ्याच्या आधीची व्यवस्था म्हणून आपल्या धुऱ्यांना आगी लावल्या. ही आग बघता-बघता रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या झाडापर्यंत पोहचली. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ही आग दोन दिवसापर्यंत धुमसत राहिली. संपूर्ण परिसर आगीने कवेत घेतल्याने लाखोंचे नुकसानही झाले आहे.
धुऱ्यांना आगी लावणे ही बाब दरवर्षीची असली तरी यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांच्यावतीने या परिसरातील कास्तकारांना तश्या प्रकारच्या सुचना न दिल्यामुळे किंवा सतर्कता न बाळगल्यामुळे सदर आगी लागल्याचे व आगीत शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून लावलेली झाडेही भस्मसात झाल्याचे बोलले जात आहे. एकीकडे वृक्षलागवडीसाठी शासनाच्यावतीने प्रयत्न होत आहे. चार कोटी वृक्षलागवडीसाठी परिश्रम घेतले जात आहे. जिल्हाधिकारी पासून ते विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यासाठी राबत आहे. परंतु, काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनेवर पाणी फेरले जात आहे. यापूर्वी तालुक्यात पं. स. स्तरावर सर्व ग्रा.पं.ना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यावर चार ते पाच कोटींचा खर्च करण्यात आला. शासनाचा या योजनेवर हा सर्व खर्च होवून सुद्धा ही वृक्षलागवड कागदावर ठरली होती. कोटींचा निधी खर्च झालेली वृक्ष जळाल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मारोती लोहवे यांनी केली आहे.
खर्च झालेला शासकीय निधी गेला वाया
पंचायत समिती स्तरावरून आदेश निर्गमित करीत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्या आदेशाची अंमलबजावणीही बहुतांश गावात झाली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय निधीही खर्च करण्यात आला. परंतु, जी रोपटी अल्पावधीतच मोठी झाली तिच धुºयाला लावलेल्या आगीत भस्मसात झाल्याने शासनाचा निधीही वाया गेल्याचे म्हटले जात आहे.