श्री साबाजी अॅग्रोटेकला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 11:36 PM2018-04-22T23:36:53+5:302018-04-22T23:36:53+5:30
ईसापूर येथील श्री साबाजी अॅग्रोटेक कारखान्याला आग लागली. यात सोयाबीन, तूर व पऱ्हाटीचे कुटार जळून भस्मसात झाले. ही आग शनिवारी दुपारी तीन वाजता लागुन रात्री उशीरापर्यंत धुमसत होती. यात कारखाना मालकाचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी: ईसापूर येथील श्री साबाजी अॅग्रोटेक कारखान्याला आग लागली. यात सोयाबीन, तूर व पऱ्हाटीचे कुटार जळून भस्मसात झाले. ही आग शनिवारी दुपारी तीन वाजता लागुन रात्री उशीरापर्यंत धुमसत होती. यात कारखाना मालकाचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.
आगीवर ताबा मिळविण्याकरिता देवळी, पुलगाव नगर परिषदेसह सीएडी कॅम्प पुलगाव येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचा काही भाग धुमसत असल्याचे लक्षात आल्याने रविवारी पूर्ण दिवसापर्यंत ही आग देवळी न.प. अग्निशामक दलाच्या सहाय्याने विझविण्यात आली. या आगीत पाच लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
ईसापूर येथील यवतमाळ-वर्धा महामार्गावर स्थानिक नरेश अग्रवाल यांच्या मालकीचा श्री साबाजी अॅग्रोटेक कारखाना कार्यरत आहे. या कारखान्यात सोयाबीन, तूर व पऱ्हाटीच्या कुटारापासून व्हाईट कोल तयार करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. त्यामुळे याठिकाणी तिन्ही पीक मालाच्या कुटाराची मोठ्या प्रमाणात साठवणूक होती. घटनेच्या दिवशी परिसरातील कास्तकारांनी शेतधुऱ्यांना लावलेली आग, कारखान्यापर्यंत पोहचल्याने कुटाराने पेट घेतला. कारखान्याच्या चारही बाजुने ही आग लागल्याने देवळी न.प. तसेच पुलगाव येथील न.प. व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. घटनेच्या दुसऱ्या दिवसपर्यंत ही आग धुमसत होती.
शेतधुºयांना लावलेल्या आगीमुळे याआधी सुद्धा रस्त्याचे दुतर्फा लावलेली झाडे जळून खाक झाल्याच्या अनेक घटना घडून लाखोंचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.