विद्युत तारांच्या ठिणगीने आग
By Admin | Published: April 16, 2017 12:57 AM2017-04-16T00:57:59+5:302017-04-16T00:57:59+5:30
विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन उडालेल्या ठिणगीने आग लागली.
एकांबा येथील घटना : शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान
सारवाडी : विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन उडालेल्या ठिणगीने आग लागली. यात एकांबा येथील शेतकरी सुधाकर ताथोडे यांचे दीड लाख व रामकृष्णा किनकर यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.
आगीमध्ये सुधाकर ताथोडे यांचा संपूर्ण गोठा जळाला. यात ९० हजार रुपये किमतीचे १७०० बांबूसह शेतीपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी आले. शेतीसाहित्यासह मोसंबीची २० झाडेही जळाली. आगीत त्यांचे दीड लाखांच्या वर नुकसान झाले. रामकृष्णा किनकर यांच्या शेतातील संत्र्याची ४० झाडे व ८ स्प्रिंकलर नळी बंडल आगीत खाक झाले. यात त्यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले; पण आगीवर ताबा मिळेपर्यंत सर्वच साहित्याचा कोळसा झाला होता. या प्रकरणी शेतकऱ्यांनी सारवाडी येथील वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याला तक्रार दिली. पटवाऱ्यालाही आगीची माहिती दिली. महावितरणने शेतकऱ्याला त्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)