गोठ्याला आग; तीन जनावरांचा मृत्यू
By admin | Published: May 24, 2017 12:48 AM2017-05-24T00:48:29+5:302017-05-24T00:48:29+5:30
नजीकच्या आपटी शिवारातील निशाद ज्ञानेश्वर काळे यांच्या शेतातील गोठ्याला सोमवारी दुपारी शॉटसर्किटमुळे आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाचणगाव : नजीकच्या आपटी शिवारातील निशाद ज्ञानेश्वर काळे यांच्या शेतातील गोठ्याला सोमवारी दुपारी शॉटसर्किटमुळे आग लागली. या आगीत दोन गायींसह एका वासराचा होरपळून मृत्यू झाला. शिवाय गोठ्यातील काही साहित्याचाही कोळसा झाला.
घटनेचे गांभीर्य कळाल्याने नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली; परंतु ते आगीसमोर हतबल ठरले. सिंचनाचे पाईप, ढेपीची पोती, कुटार, फवारणी पंप, आॅईल इंजीनसह शेतीउपयोगी वस्तू आगीच्या भक्षस्थानी आल्या. यात शेतकऱ्यांचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण यांनी घटनेचा पंचनामा केला. पशुधन अधिकारी डॉ. दिलीप कडू यांनी मृत जनावरांचे शविच्छेदन केले. या शेतकऱ्याला मदत मिळण्याची मागणी होत आहे.
महावितरणकडून पाहणी
शॉटसर्किटने आग लागल्याची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकऱ्यांनी घटनेची पाहणी केली व त्याबाबत वरिष्ठ स्तरावर कळविले आहे. महसूल विभागाने दखल घेत तलाठी चौधरी यांनी पंचनामा केला व अहवाल देवळी तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांना सादर केला. सध्या शेतकरी पेरणी पूर्व मशागतीच्या कामाकडे लक्ष देत आहेत. त्यातच अशी घटना म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणावे लागेल. खरीपाच्या तोंडावर झालेल्या नुकसाने शेतकरी हतबल झाला आहे.