विदर्भातील पहिली शेळी बाजारपेठ जागेमुळे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 09:37 PM2018-03-24T21:37:50+5:302018-03-24T21:37:50+5:30
शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय वाढीस लागावा या उद्देशाने जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाद्वारे शेळीपालन व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. विदर्भातील पहिली शेळी बाजारपेठ देवळी येथे करण्यात येणार होती; पण जागा उपलब्ध होत नसल्याने सदर बाजारपेठ निर्मितीचे काम आता रखडले असल्याची माहिती समोर आली आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय वाढीस लागावा या उद्देशाने जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाद्वारे शेळीपालन व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. विदर्भातील पहिली शेळी बाजारपेठ देवळी येथे करण्यात येणार होती; पण जागा उपलब्ध होत नसल्याने सदर बाजारपेठ निर्मितीचे काम आता रखडले असल्याची माहिती समोर आली आहे. सदर बाजारपेठ देवळी येथेच निर्माण करण्यासाठी खासदारांचा आग्रह असला तरी जागा उपलब्ध नसल्याने प्रशासनासमोर नवीनच पेच निर्माण झाला आहे.
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. यावर उपाययोजना म्हणून शेतकºयांना शाश्वत उत्पादनाचे साधन निर्माण करून देण्यासाठी पशुपालन व्यवसायाकडे वळविण्यात येत आहे. त्यातूनच शेळीपालन व्यवसाय वाढीला लावण्यासाठी शेतकºयांना पशुसंवर्धन विभागाकडून शेळीपालनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. शेळीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विदर्भात पहिली बाजारपेठ देवळी येथे निर्माण करण्याची घोषणाही तीन महिन्यांपूर्वी खा. रामदास तडस यांच्या उपस्थितीत देवळी येथे करण्यात आली होती. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधीही उपलब्ध करून देण्यात येणार होता.
अधिकृत घोषणेमुळे पशुसंवर्धन विभागाने बाजारपेठेसाठी देवळी येथे जागेचा शोध सुरू केला; पण देवळी येथे शासनाची कोणतीही जागा सध्या उपलब्ध नाही, अशी माहिती तहसीलदारांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांना दिली. यामुळे देवळी येथे या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध होण्याची आशा मावळली आहे. देवळी लगत असलेल्या सालोड (हिरापूर) येथे परिवहन विभागाला दिलेल्या जागेच्या शेजारी शासकीय जागा उपलब्ध आहे; पण या ठिकाणी सदर शेळी बाजारपेठ निर्माण करण्याबाबत राजकीय मतैक्य झालेले नाहीत. सालोड (हिरापूर) हे वर्धा विधानसभा क्षेत्रात येणारे गाव असल्याने येथे ही बाजारपेठ निर्माण करण्यास खासदारांचा विरोध असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परिणामी, विदर्भातील पहिली शेळी बाजारपेठ जागेच्या अभावी रखडली आहे.
राज्यात सध्या पश्चिम महाराष्ट्रात तीन शेळी बाजारपेठा सुरू केल्या आहेत; पण विदर्भातील या पहिल्याच बाजारपेठेला ग्रहण लागले आहे.
एक कोटी देण्याची केली होती घोषणा
गोट फार्म (बाजार पेठ) उपलब्ध करुन देण्यासाठी जमीन व शेड उभारणीसाठी १ कोटीचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा खा. रामदास तडस यांनी १ डिसेंबर २०१७ रोजी देवळी येथे आयोजित शेळीपालनकार्यशाळेत केली होती. विदर्भ शेळी पालनात मागास आहे. यामुळे शेळी पालकांना संघटीत करुन शेळीचे मटण, लोकर, खुरे, खन आदीचे महत्त्व पटवून देण्यासह प्रत्यक्ष नगानुसार शेळीची विक्री व्हावी म्हणून बाजारपेठेची संकल्पना मांडली होती.