विदर्भातील पहिले शेळी मार्केट वर्धेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:15 AM2019-01-08T11:15:10+5:302019-01-08T11:17:41+5:30
विदर्भातील पहिली गोट (शेळी) बाजारपेठ वर्धा जिल्ह्याच्या सालोड (हिरापूर) येथे उभी राहणार आहे. जागेचा तिढा सुटला असून जिल्हा प्रशासनाने या बाजारपेठेसाठी जानेवारी महिन्यात दोन हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आहे.
अभिनय खोपडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदर्भातील पहिली गोट (शेळी) बाजारपेठ वर्धा जिल्ह्याच्या सालोड (हिरापूर) येथे उभी राहणार आहे. जागेचा तिढा सुटला असून जिल्हा प्रशासनाने या बाजारपेठेसाठी जानेवारी महिन्यात दोन हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आहे. सदर शेळी बाजाराकरिता ३ कोटी रूपयांच्या निधीची गरज आहे. खासदार रामदास तडस यांनी राज्याचे वित्त नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. व त्यांनी निधी देण्याबाबत हिरवी झेंडी दिली असल्याने या बाजारपेठेचा मार्ग मोकळा झाला आहे.
वर्धा जिल्ह्यात सालोड (हिरापूर) येथे शासकीय २ हेक्टर जागेवर विदर्भातील पहिले व महाराष्ट्रातील आगळेवेगळे गोट मार्केट यार्ड स्थापन करण्यात येणार आहे. सदर जागा जिल्हाधिकारी, वर्धा यांनी ४ जानेवारी २०१९ अन्वये आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे यांचे नावे अभिहस्तांकीत करण्यात आलेली आहे. सदर शेळी बाजार दर शुक्रवारला सुरू राहणार असून त्यादिवशी शेळ्यांची खरेदी-विक्री होईल. त्यामुळे ग्रामपंचायत उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होईल तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेळ्याकरीता बाजारपेठ उपलब्ध होईल व त्यांच्या उत्पादनास योग्य बाजारभाव मिळेल. गोट मार्केट यार्डमध्ये लेंडी खत प्रकल्प करीता शेळीपालकांकडून योग्य दराने शेळ्यांची लेंडी खरेदी करून त्यावर प्रक्रिया केल्या जाईल व उत्पादित लेंडी खत पॅकिंग करून मोठ्या शहरामध्ये विक्री केल्या जाईल. गोट मार्केट यार्डमध्ये उच्चमूल्यवर्धित व गुणवत्तापूर्ण शेळ्यांची पैदास कार्यक्रम राबविल्या जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना उच्च प्रतिचे बोकड खरेदी साथी उपलब्ध होणार आहे. तसेच उर्वरित उत्पादन मुंबई, हैद्राबाद सारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये विक्री करता येईल. शेतकरी प्रशिक्षण केंद्र अद्यावत, वातानुकूलित राहणार असून त्यामध्ये एकाच वेळी १०० शेतकऱ्यांना/पशुपालकांना प्रशिक्षणाची सोय असणार आहे. तसेच सदरील प्रशिक्षण केंद्र इतरवेळी विविध विभागाचे प्रशिक्षणाकरिता नाममात्र शुल्क आकारून उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकरी निवासमध्ये बाहेरगावरून आलेल्या शेळीपालकांना निवासाची विनामुल्य व्यवस्था राहील, अशी माहिती देवळी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय खोपडे यांनी दिली आहे. गोट मार्केट यार्डमध्ये अंदाजे १ एकर जागेमध्ये चारा बाग राहील. यामध्ये शेळ्याकरिता आवश्यक प्रगत बहुवार्षिक चारा पिकांची लागवड करण्यात येईल. चारा बागेमध्ये उत्पन्न होणारा चारा बाजाराचे दिवशी शेळीपालकांच्या शेळ्याकरिता माफक दराने उपलब्ध केल्या जाईल तसेच शेतकऱ्यांना गरजेनुसार ठोंबे शासकीय दराने पुरवठा केल्या जाईल. पैदाशीसाठी ठेवलेल्या शेळ्यांना सुध्दा सदरील चारा बागेतून चारा पुरवठा केल्या जाईल. गोट मार्केट यार्डमध्ये बाजाराचे दिवशी पशुप्रथोमपचार केंद्र कार्यरत राहील. याकरिता अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासणार नाही. सालोड (हि.) येथे जिल्हा परिषद, वर्धा अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना, श्रेणी- २ कार्यरत असून सदरील दवाखान्यातील कर्मचारी बाजाराचे दिवशी पशुवैद्यकीय सेवा पुरवतील.
या सुविधा राहणार मार्केटमध्ये
मार्केट यार्डमध्ये शेळ्यांचे दुधावर प्रक्रिया करून निर्मित उत्पादने उदा. पनीर, चिज, आईसक्रीम, साबण, शांपु इ. बाजारपेठेमध्ये उमेद मार्फत विक्री केल्या जाईल. याकरिता शेळी पालकांकडून अतिरिक्त शेळ्यांचे दुध खरेदी करण्यात येईल. गोट मार्केट यार्डमध्ये शेळ्यांकरिता दाणा मिश्रण, पशुचाट (मिनरल विट) तयार करून शेळीपालकांना किफायतशीर दरावर उपलब्ध करून देण्यात येईल.