कारंजा तालुका राज्यात प्रथम
By admin | Published: May 8, 2016 02:37 AM2016-05-08T02:37:19+5:302016-05-08T02:37:19+5:30
ग्रामस्तरावरील प्रशासन लोकाभिमुख करून प्रशासनाला गती देण्यासोबत समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ
पंचायत सशक्तीकरण अभियान : १०० पैकी ९७ गुण घेऊन अव्वल
कारंजा (घा.) : ग्रामस्तरावरील प्रशासन लोकाभिमुख करून प्रशासनाला गती देण्यासोबत समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा.) पंचायत समिती पंचायत राज सशक्तीकरण अभियानात राज्यात प्रथम आली. केंद्रीय ग्रामविकास मंत्री विरेंद्र सिंह यांच्या हस्ते कारंजा पंचायत समितीच्या सभापती संगीता खोडे, गट विकास अधिकारी बाळासाहेब यावले यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व धनादेश देऊन गौरविण्यात आले.
जमशेदपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत राज दिन कार्यक्रमात कारंजा पंचायत समितीचा गौरव करण्यात आला. यावेळी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. पंचायत राज सशक्तीकरण अभियानांतर्गत सन २०१३-१४ मध्ये केंद्र शासनाच्यावतीने सुरू केलेल्या केंद्रीय पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत शासनाच्या सर्व निकषांमध्ये कारंजा पंचायत समिती पात्र ठरली.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची सांगड घालून पंचायत समितीने लोकाभिमुख कामे केली. विविध योजनेचे फायदे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, मनरेगांतर्गत सिंचन विहिरी, फळबाग, जनधन, वृक्ष लागवड, जलयुक्त शिवार अभियान, इंदिरा आवास योजना, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामसभांची प्रभावी अंमलबजावणी, गावातल्या गावातच रोजगार उपलब्ध करून देणे, गावकृती आराखड्याचे सुक्ष्म नियोजन करून विकासकामाला गती देण्याचे कार्य कारंजा पंचायत समितीने केले आहे. या सर्व बाबींची पाहणी व निरीक्षण अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या तपासणी पथकाने केल्यानंतर राज्यातून कारंजा समितीने १०० पैकी ९७ गुण घेऊन अव्वल क्रमांक प्राप्त केला. तर दुसऱ्या क्रमांकावर कराड पंचायत समितीला ९५ गुण मिळवून बहुमान पटकावला.
नागपूर विभागीय आयुक्त अनूप कुमार, विकास विभागाचे उपायुक्त अनिलकुमार नवाले, आस्थापना विभागाचे उपआयुक्त कमलकिशोर फुटाणे, सहायक आयुक्त दया राऊत, तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांनी याकरिता मार्गदर्शन केले. तसेच या यशाबद्दल पंचायत समितीच्या सभापती खोडे, गटविकास अधिकारी यावले यांचे अभिनंदन केले.
अभियान यशस्वीतेसाठी सभापती खोडे, उपसभापती शुभांगी पठाडे, जिल्हा परिषद, पंचायात समिती, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकाऱ्यांनी, तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. या सर्वांचे आभार सभापती, गटविकास अधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर मानले.(तालुका प्रतिनिधी)