कुणालाही फोन केल्यास प्रथम ‘कोरोना’ची मिळेल माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 05:00 AM2020-03-09T05:00:00+5:302020-03-09T05:00:24+5:30
इतकेच नव्हे तर कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. सध्या कुणालाही फोन केल्यावर कोरोना व्हायरस पासून बचावासाठी प्रत्येक नागरिकाने काय करावे, याची माहिती देणारी सुमारे ३३ सेकंदाची ऑडिओ क्लिप नागरिकांना ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनीही दक्ष रहावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : चीन पाठोपाठ आता भारतात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्हा प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशाच सूचना वर्धा जिल्हा प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या असून आरोग्य विभागही कोरोनासोबत दोन-दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे.
इतकेच नव्हे तर कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. सध्या कुणालाही फोन केल्यावर कोरोना व्हायरस पासून बचावासाठी प्रत्येक नागरिकाने काय करावे, याची माहिती देणारी सुमारे ३३ सेकंदाची ऑडिओ क्लिप नागरिकांना ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनीही दक्ष रहावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्यात अद्याप कोरोनाचा एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, दक्षतेसाठी आरोग्य विभागाने जागृती सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा येथील एक व्यक्ती साऊथ कोरीया येथून वर्ध्याला आला तसेच हिंगणघाट येथील एक युवक इरान येथील मसद शहरातून हिंगणघाट येथे आल्याने त्यांच्यावर आरोग्य विभाग पाळत ठेऊन आहे. त्यांच्यात कोरोना व्हायरसची लागण झाल्याची कुठलेही लक्षणे अद्याप आढळलेली नसल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर यापूर्वी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील १३ विद्यार्थ्यांना १४ दिवसांसाठी देखरेखीत ठेवण्यात आले होते.
जिल्हा सामान्य रूग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. विविध माध्यमातून कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेचीही जनजागृती केली जात आहे. कोरोना व्हायरस हा जीवघेणा असल्याने त्याची लागण होण्यापूर्वी नागरिकांनी दक्षता म्हणून काय करावे याची माहिती आता कुणालाही फोन केल्यावर सदर आॅडिओ क्लीपच्या माध्यमातून दिली जात आहे.
पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह इतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांसह सर्वसामान्य नागरिकांच्या मोबाईलवर ही डायलर टोन ऐकू येत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांची जागृती होण्यास मदत होत आहे.
आजनसरा, फरिदबाबा दर्ग्याच्या अध्यक्षांना सूचना
आजनसरा येथील भोजाजी महाराज मंदिर आणि गिरड येथील फरिदबाबा दर्गा येथे गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. यात्रास्थळी, गर्दीच्या ठिकाणी कोरोना व्हायरसचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी यांनी आजनसरा देवस्थान मंदिर समितीचे अध्यक्ष तसेच गिरड येथील फरिदबाबा दर्ग्याचे अध्यक्ष यांना खबरदारी घेण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
माजी राष्ट्रपतींचा दौरा रद्द
माजी राष्ट्रपती प्रतीभा पाटील या महिलादिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रविवारी वर्ध्यात येणार होत्या. पण, अचानक त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. कोरोनामुळे हा दौरा रद्द करण्यात आला असावा असा कयास बांधल्या जात आहे.